घाटकोपर ते कासारवडवली मेट्रोसेवा सुरू करणार : मुख्यमंत्री
मुंबईत सुरू झालेल्या बहुप्रतीक्षेत मेट्रोसेवेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ही सेवा आता ठाण्यापर्यंत नेण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. घाटकोपर-ठाणे मार्गावर मेट्रो प्रकल्प राबवण्याबाबतचा महिनाभरात घोषणा करण्यात येईल, असे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी विधानसभेत सांगितले. त्याचबरोबर यापुढील मेट्रो रेल्वे प्रकल्प हे खासगी कंपनीला न देता ते सरकारकडूनच उभारले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुंबईतील घाटकोपरपासून ठाण्यात कासारवडवलीपर्यंत ३१ किलोमीटर लांबीचा २२ हजार कोटी रुपयांचा मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवण्यासाठी ‘राइट्स’ या शासकीय संस्थेकडून सर्वेक्षण अहवाल मागवण्यात आला आहे. या संस्थेने आपला प्राथमिक अहवाल सादर केला असून महिनाभरात अंतिम अहवाल येईल. त्यानंतर घाटकोपर-ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाची घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात लक्षवेधी मांडणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची तात्काळ घोषणा करण्याचा आग्रह धरला. मात्र शासकीय संस्था प्रकल्प अहवाल तयार करत आहे. हा अहवाल लवकर सादर करण्यासाठी कोणताही दबाव मी आणणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

७० लाखांची प्रवाशांची ‘मेट्रो’
* मुंबई महानगर प्रदेशातील शहरे मेट्रो रेल्वेने जोडण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने बृहद् आराखडा तयार केला आहे.
* यात नुकत्याच सुरू झालेल्या वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेबरोबरच घाटकोपर-कासारवडवली, चारकोप-वांद्रे-मानखुर्द, कुलाबा ते सीप्झ, शिवडी-प्रभादेवी, सीप्झ-कांजूरमार्ग अशा एकूण नऊ वेगवेगळय़ा मार्गाचा समावेश आहे.
* त्यांची एकूण लांबी १६० किलोमीटर असून हे सर्व मार्ग पूर्ण झाल्यावर रोज सुमारे ७० लाख प्रवासी मेट्रो रेल्वेतून प्रवास करतील.