06 August 2020

News Flash

‘बुलेट ट्रेन’मधून उतरताच ‘मेट्रो’मार्गे दक्षिण मुंबईत

मुंबईतील प्रवास सोपा व्हावा या दृष्टीने बुलेट ट्रेनच्या स्थानकाला मेट्रोची स्थानके जोडली जाणार आहेत.

मुंबईतील प्रवास सोपा व्हावा या दृष्टीने बुलेट ट्रेनच्या स्थानकाला मेट्रोची स्थानके जोडली जाणार आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो स्थानकांशी जोडणार; पादचारी पूल तसेच मार्गिकांची उभारणी

मुंबई आणि अहमदाबाद यांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांचा मुंबईतील प्रवास सोपा व्हावा या दृष्टीने बुलेट ट्रेनच्या स्थानकाला मेट्रोची स्थानके जोडली जाणार आहेत. या दृष्टीने ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) विचार करत असून लवकरच याचा आराखडा तयार केला जाणार आहे.

व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेनमधून शहरात येणाऱ्या व्यापाऱ्यांना दक्षिण आणि पश्चिम मुंबईत जाणे सोयीस्कर व्हावे या दृष्टीने मेट्रोची स्थानके बुलेट ट्रेनच्या वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाला जोडली जाणार आहेत. शहरात सध्या मेट्रोचे जाळे पसरविले जात आहे. यातील कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो भुयारी मार्ग-३ आणि डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो हा मेट्रो मार्ग २ ब वांद्रे-कुर्ला संकुलातून जाणार आहे. या दोन्ही मार्गामध्ये वांद्रे-कुर्ला संकुलचे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईतील बुलेट ट्रेनच्या स्थानकाला जोडले जाणार आहे. यामुळे बुलेट ट्रेनने दक्षिण मुंबईत आणि पश्चिम उपनगरांमध्ये प्रवास करण्यासाठी व्यापाऱ्यांना वाहनाने किंवा रेल्वेने पुढील प्रवास करण्याची गरज भासणार नाही. ते मेट्रोचा वापर करून प्रवास करू शकतात.

या दोन्ही मार्गावरील मेट्रो स्थानके वांद्रे-कुर्ला संकुलातील प्राप्तिकर कार्यालय स्थानकाच्या पुढच्या वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकावर एकत्रित येणार आहेत. या स्थानकापासून काही अंतरावरच बुलेट ट्रेनचे स्थानक असणार आहे. हे स्थानक मेट्रो स्थानकाला जोडण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. हे करण्यासाठी आवश्यक तेथे पादचारी पूल अथवा मार्गिका उभ्या केल्या जातील. वांद्रे-कुर्ला संकुलातून मुंबई शहरात येण्यासाठी सध्या केवळ रस्त्याचा मार्ग उपलब्ध आहे. या मार्गात संकुलातून बाहेर पडल्यावर एकीकडे कुर्ला येथील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. तर दुसऱ्या बाजूस वांद्रे कलानगर येथील वाहतूक कोंडीतून पुढे जावे लागते. याचबरोबर शहरातील इतर भागातही वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणावर असते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊ शकतो. यात वेळेची बचत व्हावी व प्रवाशांना योग्य वेळेत प्रवास करता यावा यासाठी ही मेट्रो स्थानके बुलेट ट्रेनच्या स्थानकाला जोडणे सोयीस्कर ठरणार आहे. यानुसार एक प्रस्ताव तयार करण्याचे विचारधीन असल्याचे एमएमआरडीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. याचबरोबर ही जोडणी झाल्यास बुलेट ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू शकेल असा अंदाज बांधला जात आहे. सध्या बुलेट ट्रेनला होत असलेला विरोध लक्षात घेत प्रशासकीय पातळीवर सुरू असलेले हे नियोजन बुलेट ट्रेन प्रकल्पाला अधिक बळकटी देणारे ठरू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2017 4:49 am

Web Title: mumbai metro stations will be connected to the bullet train station
Next Stories
1 सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजप आणि काँग्रेसचा दावा
2 शताब्दी रुग्णालयात रुग्णाच्या डोळ्याला उंदराचा चावा
3 स्वच्छता अभियानाच्या नावाखाली महिलांची मानहानी
Just Now!
X