मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी दिलेल्या निर्णयानंतर वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीटाचे दर वाढणार आहेत. न्यायालयाने राज्य सरकारची दरवाढीविरोधातील याचिका फेटाळताना रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने निर्णय दिला आहे.
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी सध्याचे तिकीटदर १०, १५, २० इतके असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे ते आता १०, २०, ३० आणि ४० रुपये इतके होतील. तिकीटाचे हे नवे दर उद्यापासून (शुक्रवार) लागू होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो रेल्वेचे दर ‘जैसे थे’ असल्याने रोज ८५ लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा रिलायन्सतर्फे करण्यात आला होता.
यापूर्वी मेट्रो रेल्वेचे दर निश्चित करणारी समिती स्थापन करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप ती स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस हालचाली होताना दिसत नव्हत्या. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी दर निश्चित करणारी समिती स्थापन करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र सरकारतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. परंतु जुलै महिन्यापासून समिती स्थापन करण्यासाठी वारंवार आदेश देऊनही केंद्र सरकारतर्फे ही समिती स्थापन केली जात नसल्याची बाब ‘रिलायन्स’तर्फे  न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच समिती स्थापन झाली नाही, तर रिलायन्सच्या दरवाढीच्या प्रस्तावाचा विचार करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. जुलैपासून परिस्थिती ‘जैसे थे’च असून, समिती स्थापन कधी केली जाईल, ती दर निश्चित कधी करेल, याबाबत अद्यापही काहीच स्पष्टता नाही. परिणामी कंपनीला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असल्याचे स्पष्ट करीत रिलायन्सने  दरवाढीच्या प्रस्तावाबाबत निर्णय देण्याची विनंती न्यायालयाला केली होती.