|| अक्षय मांडवकर

मेट्रो प्रकल्पांच्या देखरेखीसाठी एमएमआरडीएची ‘वॉर रूम’

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी प्राधिकरणाने स्वतंत्र्य ‘वॉर रूम’ची निर्मिती केली आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रकल्पांच्या कामाचे थेट प्रक्षेपण ‘वॉर रूम’मध्ये बसून पाहता येणार आहे. या माध्यमातून शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामावर नियंत्रण आणि देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. सध्या शहरात दक्षिण मुंबईसह पश्चिम आणि मध्य मुंबईत विविध मेट्रो मार्गिकांचे काम सुरू आहे. पश्चिम मुंबईत दहिसर (पू) ते अंधेरी (पू) (मेट्रो ७) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो २ ए) या दोन्ही मार्गिकांचे काम प्रगतिपथावर आहे. या दोन्ही मार्गिकांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून २०१९च्या अखेरीपर्यंत या मार्गिकांचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तसेच डी. एन. नगर ते मंडाले (मेट्रो २बी) आणि मध्य मुंबईला ठाणे शहराशी जोडणारी वडाळा-कासारवडवली (मेट्रो ४) या मेट्रो मार्गिकांच्या प्राथमिक कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामांवर देखरेख ठेवण्याच्या आणि एका ठिकाणावरून त्यांचे नियंत्रण करण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएने वॉर रूमची निर्मिती केली आहे. प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात हे कक्ष उभारण्यात आले आहेत.

मेट्रो प्रकल्पांच्या बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. याआधारे सुरू असलेल्या कामांवर नजर ठेवण्याचे काम एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत होते. मात्र या सर्व प्रक्रियेचे एककेंद्रीकरण करण्यासाठी या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीव्यतिरिक्त ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रथमच बांधकामस्थळांचे चित्रीकरण केले जाणार आहे. हे चित्रीकरण थेट या वॉर रूममध्ये पाहण्याची सुविधा तयार करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बुधवारी या कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. त्या दिवशी मुख्यमंत्री विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेणार असून प्रस्तावित प्रकल्पांच्या कामाला परवानगी देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच एमएमआरडीएच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरणदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.