कल्याणमध्ये आज मुंबई मेट्रो ५च्या प्रकल्पाच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भुमिपुजन पार पडले. दरम्यान, उपस्थितांना मुंबई मेट्रोबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कल्याणवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होत आहे. या मार्गामुळे भिवंडी मुंबईशी जोडली जाईल, अत्यंत कमी वेळेत हे मेट्रोचं काम पूर्ण करण्यात येईल. मुंबईतील या मेट्रो मार्गांमुळे येत्या पाच वर्षात १ कोटी प्रवाशांची सोय होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मेट्रो ५ ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावर धावणार आहे. या प्रकल्पाचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, लवकरच मुंबईत सर्व प्रकारच्या मोडचा प्रवास एकाच तिकीटावर आणण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच टिकीटावर तुम्ही कोणत्याही मोडमधून प्रवास करु शकता. अर्बन मोबिलिटीमध्ये सर्वात चांगले काम महाराष्ट्रात होणार असून त्यासाठी आम्ही मुंबई, पुणे, नागपूर येथे मेट्रोची कामे सुरु केली आहेत. त्यानंतर लवकरच नाशिकमध्येही काम सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईतील वाहतुक व्यवस्था सुलभ करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. लोकांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानकाजवळ घरांचे प्रकल्प उभारण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली ते तळोजा आणि मीरा-भाईंदर ते वसई या दोन मार्गावरील मेट्रो मार्गाची घोषणा केली.