मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अर्थसंकल्पात ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तब्बल ८२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून उड्डाणपूल, शहरांमध्ये बाह्य़ वळण रस्ते, रस्त्यांची सुधारणा ही कामे केली जाणार आहेत.

प्राधिकरणाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महानगर प्रदेशातील शहरांमधील वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देण्यात आला असून त्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी ८२७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून ठाणे-घोडंबदर सेवा रस्ता, ठाण्यातील उड्डाणपुलांचे ७० टक्के काम पूर्ण करणे, विटावा येथे स्कायवॉक बांधणे, पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई आग्रा रोड ते नाशिक रोड तसेच घोडबंदर रोडदरम्यान बायपास रस्ता बांधणे, ठाणे-बेलापूर रस्त्यावर सविता केमिकल जंक्शन, घणसोली नाका येथे उड्डाणपूल आणि महापे जंक्शन व्हेइक्युलर अंडरपास बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत. तसेच कल्याण-भिवंडी रत्यावर उल्हास खाडीवर दुर्गाडी येथे चौपदरी पूल,  रांजणोली, मानकोली येथे उड्डाणपूल, मुंब्रा, शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल, खोपोली शहर वळण रस्त्याचे दुपदरीकरण ही कामे करण्यात येणार आहेत.