मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी फक्त म्हाडाचा एक पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे दरवर्षी म्हाडाची लॉटरी कधी निघणार? त्याची सर्वसामान्यांना प्रतिक्षा असते. यंदा जूनच्या शेवटच्या आठवडयात म्हाडाच्या घरांसाठी जाहीरात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर म्हाडा घरांसाठी सोडतीची प्रक्रिया सुरु होईल. ऑगस्ट महिन्यात मुंबईतील म्हाडाच्या घरांची सोडत निघेल. दरवर्षी मे महिन्यात म्हाडाच्या घरांसाठी सोडत निघते. मात्र यावर्षी एक महिना उशिर झाला आहे.

म्हाडा घरांसाठी जूनच्या शेवटच्या आठवडयात जाहीरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर लगेचच पुढची सर्व प्रक्रिया सुरु होईल. १ हजार घरांसाठी ही सोडत निघणार असून या घरांना डिसेंबर अखेपर्यंत ओसी प्रमाणपत्र देण्यात येईल असे म्हाडाचे अधिकारी दिपेंदर सिंह यांनी सांगितले. जून-जुलैमध्येच म्हाडाचा कोकण विभागही लॉटरी काढण्याच्या तयारीत आहे.

कोकण विभागाकडून विरारमधील ३,३०० घरांसाठी सोडत काढण्यात येऊ शकते. १ हजार घरापैंकी म्हाडाने मुंबईमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ८०० आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी २०० घरे ठेवली आहेत. गोरेगाव, बोरिवली, विक्रोळी, मुलुंड, अॅण्टॉप हिल आणि मानखुर्द पट्ट्यातील घरांसाठी सोडत काढण्यात येईल.