मुंबईत ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. ‘म्हाडा’च्या मुंबईतील 217 घरांसाठी आज सोडत काढली जाणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण ‘म्हाडा’च्या वेबसाईटवरून केले जाणार आहे. 217 सदनिकांसाठी सुमारे 66 हजार जणांनी यावेळी अर्ज केले होते. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी चेंबुरच्या सहकार नगरमधील 170, तर मध्यम उत्पन्न गटासाठी 47 सदनिकांचा समावेश आहे.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. वांद्र्यातील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात वेबकास्टिंगद्वारे सकाळी 10 वाजेपासून सोडत काढण्यात येणार असून त्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे http://lottery.mhada.gov.in आणि http://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी ५३,४५५ आणि मध्यम उत्पन्न गटासाठी १२,६३६ अर्ज दाखल झाले आहेत. या दोन्ही गटांत अनुक्रमे सुमारे १०६ कोटी आणि ३७ कोटी इतकी अनामत रक्कम जमा झाली आहे.

मुंबई मंडळातर्फे विविध गृहप्रकल्पांमधल्या 217 सदनिकांच्या विक्रीसाठी 6 मार्चला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 13 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करुन 24 मे 2019 पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती.