सलग तिसऱ्या दिवशी उपनगरातील किमान तापमानात घट झाली. काही ठिकाणी तापमान २० अंशाखाली उतरले. कमाल तापमानात मात्र घट झाली नाही.

गेल्या आठवडय़ातील चढय़ा तापमानानंतर या आठवडय़ाच्या मध्यावर शहर आणि उपनगरातील किमान तापमान घसरण्यास तीन दिवसांपूर्वी सुरुवात झाली. गुरुवारी उपनगरातील किमान तापमानात तीन अंशाची, तर शुक्रवारी आणखी एक ते दीड अंशाची घट होऊन या मोसमात प्रथमच ते २० अंशाखाली गेले.

शनिवारी त्यामध्ये पुन्हा घट होऊन हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर १८.४ अंश किमान तापमान नोंदविण्यात आले. शहरातील किमान तापमानातदेखील घट झाली असली तरी २० अंशापेक्षा अधिकच राहिले. कुलाबा केंद्रावर २१.४ अंश तापमान नोंदविण्यात आले. उपनगर आणि महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी तापमान २० अंशाच्या आसपास राहिले.

किमान तापमानात घट होत असताना कमाल तापमानात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे उपनगरात पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसा मात्र तापमान वाढले होते.