वर्षांअखेरीस चाचण्या सुरू होण्याची शक्यता; प्रवासी सेवेत येण्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी उजाडणार

मुंबईच्या बदलत्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरा, अशी ओळख घेऊन फेब्रुवारी २०१४मध्ये सुरू झालेल्या मोनोरेलचा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत येण्यास आणखी पाच महिन्यांचा विलंब लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वडाळा डेपो ते लोअर परळ स्थानक यांदरम्यान मोनोरेलच्या चाचण्या सुरू केल्या असल्या, तरी अद्याप अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे डिसेंबर महिन्याच्या मध्यावर संपणार असून त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गावर चाचण्या घेणार आहेत. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतरच प्रवाशांसाठी हा टप्पा खुला होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त युपीएस मदान यांनी रॉयल बॉम्बे यॉट क्लबमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने एमएमआरडीएच्या विविध कामांबाबत त्यांनी माहिती दिली. त्या वेळी त्यांना मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याबाबत विचारले असता त्यांनी डिसेंबर महिन्यात मोनोरेलची सगळी कामे पूर्ण होतील, असे सांगितले.

मोनोरेलसाठी लागणारे प्लॅटफॉर्म, स्थानक उभारणी आदी कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी एका महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यानंतर सिग्नल यंत्रणा, विद्युत यंत्रणा आदी कामे हाती घेण्यात येतील. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी डिसेंबर महिना उजाडेल. त्यानंतर एमएमआरडीएतर्फे या मार्गावर चाचण्या घेतल्या जातील. अंतिमत: रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह मोनोरेलच्या चाचण्या होणार आहेत. या चाचण्या कधी १५ दिवस, तर कधी महिनाभरही चालू शकतात. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा प्रमाणपत्र दिल्याशिवाय मोनोरेलचा दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार नाही, असे मदान यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे डिसेंबर महिन्यात मोनोरेल प्रवाशांच्या सेवेत येईल, हा एमएमआरडीएचाच दावा मोडीत निघत आहे. आता मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातील एखादी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.