03 March 2021

News Flash

पावसाने जुलै महिन्याची सरासरी ओलांडली

२२ जुलैपर्यंत सांताक्रूझ येथे ८१० मिलिमीटर पाऊस पडला असून जुलै महिन्याची सरासरी ८०० मिमी आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईसह कोकणात संततधार कायम राहण्याचा अंदाज

विलंबाने येऊन अत्यंत धिम्या रीतीने मुंबईत बस्तान बसवलेल्या पावसाने जुलै महिन्याची सरासरी आठवडा शिल्लक असतानाच ओलांडली आहे. २२ जुलैपर्यंत सांताक्रूझ येथे ८१० मिलिमीटर पाऊस पडला असून जुलै महिन्याची सरासरी ८०० मिमी आहे.

जूनमधील ५२३ मिमी ही सरासरीही अखेरच्या दिवशी पूर्ण झाली होती. कुलाबा येथे मात्र सरासरीपेक्षा ९० मिमी पाऊस कमी पडला आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह कोकण परिसरात पावसाची संततधार कायम राहण्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे.

सकाळी मुसळधार सरींनी सुरुवात करणारा पाऊस दहा वाजल्यानंतर उसंत घेत असल्याचे गेले चार दिवस दिसत आहे. त्यामुळे दिवसा फारसा पाऊस नसला तरी पावसाने रात्रपाळी करून जुलै महिन्याची सरासरी आठवडाभर आधीच ओलांडली आहे. जुलैच्या पहिल्या दोन आठवडय़ांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागच्या आठवडय़ात गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईत मुक्काम ठोकला आहे. १ जून ते २२ जुलैदरम्यान मुंबईत सांताक्रूझ येथे १३३३ मिमी पाऊस पडला असून कुलाबा येथे १०११ मिमी पाऊस पडला आहे. ३० जूनपर्यंत सांताक्रूझ येथे ५२३ मिमी पाऊस पडला होता.

जुलै महिन्यात सांताक्रूझ येथे सरासरी ७९९.९ मिमी पाऊस पडतो. त्यानुसार जुलै महिन्यात आतापर्यंत ८१० मिमी पाऊस झाला असून या महिन्याची सरासरी भरून निघाली आहे. यात १८ जून रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेल्या १६३ मिमी पावसाचा समावेश आहे. कुलाबा येथे मात्र पावसाची सरासरी भरून निघालेली नाही. कुलाबा येथे सरासरीपैकी ८६ टक्के पावसाची नोंद झाली. पुढील पाच दिवसही मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:39 am

Web Title: mumbai monsoon exceeded the july month average
Next Stories
1 पावसाळ्यात आतापर्यंत ४६३ झाडांची पडझड
2 अकरावीच्या ‘कटऑफ’चे गणित बदलले
3 साहसी खेळांसाठी सर्वसमावेशक धोरण आखा
Just Now!
X