देशाच्या आर्थिक राजधानीतील करोनाचा कहर कायम असून रविवारी शहरात १२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या ४८ तासांमध्ये मुंबईत ४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांतील ६९ मृत्यूंची नोंद करण्यात आल्यामुळे मृतांचा आकडा वाढून ३६६९ वर गेला आहे. त्यामुळे मुंबईतील मृत्यूदरही ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईतील करोनामुक्तीचा दर ५० टक्के झालेला असला तरी रोज नव्याने हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. रविवारी १२४२ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६६,५०७ वर गेला आहे. तर आणखी ८६७ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. मृतांची संख्या ३६६९ वर गेली आहे. रविवारी ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३३,४९१ रुग्ण करोनामुक्त झाले. तर २९,३४७ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतांची आकडेवारी एखाद्या रुग्णालयाकडे प्रलंबित असल्यास त्याची माहिती ताबडतोब देण्याचा इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्यामुळे गेल्या काही दिवसांत मृत्यूंची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. गेल्या ४८ तासांत पालिकेकडे ११० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मात्र त्यातील ६९ मृत्यू हे १८ एप्रिल ते १८ जून या कालावधीतील आहेत. तर ४१ मृतांपैकी २८ जणांचे वय ६० वर्षांवरील आहे.

नवी मुंबईत १५४  रुग्ण

नवी मुंबई: नवी मुंबईत रविवारी १५४ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या ४,८४१ झाली आहे. तर शहरात ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १६४ झाली आहे. शहरातील २,७८८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पनवेलमध्ये ८४ रुग्ण

पनवेल : तालुक्यामध्ये रविवारी ८४ करोनाबाधित आढळले असून त्यात पालिका क्षेत्रात ६२ तर पनवेल ग्रामीणमध्ये २२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रात ५६ तर ग्रामीण भागात १२ रुग्णांचा  मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यत ९९२ नवे करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी  ९९२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे करोना रुग्णांची एकूण संख्या आता २१ हजार ५५८ इतकी झाली आहे. तर, रविवारी  ६१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७४५ इतका झाला आहे.  कल्याण-डोंबिवलीत २५४, ठाणे शहरात  १६४, नवी मुंबईत १५४, भिवंडीत १७०, अंबरनाथमध्ये १९, उल्हासनगरमध्ये ५१, बदलापूरमध्ये २५, मीरा-भाईंदरमध्ये १०६  ठाणे ग्रामीणमधील ४९ रुग्णांचा समावेश आहे.