गेले अनेक दिवस दुर्लक्षित राहिलेले दादर येथील मुंबई महापालिकेचे कलादालन दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर स्थलांतरित करावे आणि सर्वसामान्य मुंबईकरांसाठी ते खुले करावे. आपल्या व्यंगचित्रांनी राजकारणात दबदबा निर्माण करणारे, तसेच वाचकांच्या मनावर गारूड करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या कलादालनाला द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दादरमधील हिंदू कॉलनीत महापालिकेच्या शिक्षण विभागाचे मुख्यालय असून या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शिक्षण विभाग संगीत कला अकादमीच्या अखत्यारीतील सुसज्ज असे कलादालन आहे. पालिका कर्मचाऱ्यांसाठी हे कलादालन उभारण्यात आले आहे. मात्र वर्षभरात काही मोजकेच दिवस तेथे चित्रशिल्प प्रदर्शने भरविली जातात. सर्वसामान्य मुंबईकर कलारसिक मात्र या कलादालनाबाबत अनभिज्ञच आहेत. या मुख्यालयाच्या तळमजल्यावर शिक्षण विभागाच्या विविध विभागांची कार्यालये आहेत. ही कार्यालये दुसऱ्या मजल्यावर हलवून तळमजल्यावर कलादालन स्थलांतरित केले तर त्याचा कलारसिकांना अधिक फायदा होईल. तसेच मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शने भरविणे शक्य होईल आणि तेथे येणाऱ्या रसिकांमुळे कार्यालयांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी  सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव या कलादालनाला देण्यात यावे, अशी मागणी करून मंगेश सातमकर पुढे म्हणाले की, मुंबईमधील कलादालनांच्या आरक्षणाची यादी प्रचंड मोठी असून या कलादालनांचे भाडे सर्वसामान्य कलाकारांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना आपल्या चित्रांचे अथवा शिल्पांचे प्रदर्शन मुंबईत भरविता येत नाही. त्यामुळे महापालिकेने आपले कलादालन केवळ पालिका कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्य कलाकारांसाठी खुले करावे. त्यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि पालिकेच्या तिजोरीत महसुलाची भर पडू शकेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रांनी अनेकांवर आसूड ओढले. भविष्यात असे व्यंगचित्रकार पालिकेच्या शाळेतून घडविल्यास त्याचा समाजाला उपयोग होऊ शकेल. त्यामुळे पालिका शाळांमध्ये व्यंगचित्रांचे वर्ग भरविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.