27 May 2020

News Flash

मुंबई महापालिकेचे दवाखाने रात्री ११पर्यंत खुले राहणार

खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून १५ दवाखान्यांमध्ये उपचार सुविधा

(संग्रहित छायाचित्र)

खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून १५ दवाखान्यांमध्ये उपचार सुविधा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये दुपारी चारनंतरही रुग्णांना उपचार मिळावे या उद्देशाने प्रशासनाने कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून १५ दवाखान्यांमध्ये दोन वर्षे दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. कंत्राटदाराकडून उपलब्ध करण्यात येणारे वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगारांच्या वेतनापोटी पालिकेला २.७९ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

गरीब कुटुंबातील रुग्णांना स्वस्तात वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने मुंबईत विविध ठिकाणी १८६ दवाखाने सुरू केले आहेत. या दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांवर उपचार केले जातात. कार्यालयात जाणाऱ्या अनेकांना सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत दवाखान्यात जाऊन उपचार घेता येत नाहीत. तसेच खासगी दवाखान्यात उपचार घेणे त्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन पालिकेचे दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवावे, अशी मागणी  करणारे पत्र आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात केली होती.

या पत्राची दखल घेत महापौरांनी दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवण्याची सूचना केली. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे प्रशासनाने निवडक १५ दवाखाने कंत्राटदारामार्फत दुपारी ४ ते  रात्री ११ या वेळेत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दवाखान्यांसाठी वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आणि बहुउद्देशीय कामगारांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांसाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे निविदा प्रक्रियेला चार वेळा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. चौथ्या वेळी दोन कंत्राटदारांनी प्रतिसाद दिल्या. प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगाराच्या मानधनासाठी प्रति महिना अनुक्रमे ५९ हजार ६७५ रुपये आणि १७ हजार ७९२ रुपये इतक्या खर्चाचा अंदाज निविदेमध्ये व्यक्त केला होता. वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगारास प्रतिमहिना अनुक्रमे ६० हजार रुपये आणि १५,५०० रुपये मानधन  देण्याची तयारी दाखविणाऱ्या रुबी अलकेअर सव्‍‌र्हीसेस कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राट दाराला प्रत्येक दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय कामगार उपलब्ध करावा लागणार आहे.

वैद्यकीय अधिकारी, कामगार अनुपस्थित राहिल्यास कंत्राटदारास बदली व्यवस्था करावी लागणार आहे. तसे न केल्यास अथवा अन्य अटींचा भंग केल्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यास कुचराई झाल्यास कंत्राटदाराचे नाव वेळप्रसंगी काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 3:28 am

Web Title: mumbai municipal clinics will be open till 11 pm zws 70
Next Stories
1 शीव रुग्णालयातील रुग्णांच्या आहारात चपाती
2 नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे
3 पाच दोषींची फाशी कायम
Just Now!
X