राज्यात सुरू असलेल्या अनलॉक प्रक्रियेनंतर बहुतांश कार्यालयं आता सुरू झाली आहेत. परंतु सध्या लोकल सेवा सर्वांसाठी सुरू नसल्यानं कामावर जाणाऱ्या अनेक लोकांना आपलं कार्यालय रस्त्यामार्गे गाठावं लागत आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलसेवा पुन्हा कधी सुरू केली जाणार असा प्रश्न सातत्यानं सरकारकडे केला जात आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय हा १५ डिसेंबरनंतरच घेतला जाईल, अशी माहितीही चहल यांनी दिली. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली.

“गेल्या महिन्याभरातील आकडेवारी पाहिली तर मुंबईत एकूण २७ हजार रूग्ण आढळले. सध्या हे सर्व आपल्या नियंत्रणात आहे. फक्त दिवाळीनंतर काही रुग्णसंख्या वाढू शकते अशी आम्हाला भीती होती. दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांमुळे करोना आपल्याकडे आपल्याकडे पसरू नये यासाठी जागरूक राहून आपण १५ डिसेंबरपर्यंत आपण त्यावर लक्ष ठेवणार आहोत. यात ही स्थिती अशीच राहणार की वाढणार यावर लक्ष ठेवून असणार आहोत. त्यामुळे १५ डिसेंबर नंतर रेल्वे सेवा केव्हा सुरू करायची याचा आढावा घेतला जाणार आहे,” असंही चहल म्हणाले.

स्थिती नियंत्रणात

आपल्याकडे करोनाची स्थिती नियंत्रणात आहे. महिन्याभरापूर्वी करोनाच्या रूग्णांचा दुपटीचा वेग हा ११५ दिवस होता तो आता २३३ दिवसांवर गेला आहे. आज आपल्याकडे १२ हजार कोविडचे बेड आणि ८५० आयसीयू बेड्स रिकामे आहेत. हे सर्व पाहता ही स्थिती अशी राहावी असं आम्हाला वाटतं. शेजारी राज्यात गुजरातमध्ये अनेक ठिकाणी कर्फ्यू लागले आहेत. दिल्लीची स्थितीही आपण पाहिली आहे. त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होऊ नये. लॉकडाउन, दुसरी लाट याची पाळी येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सोमवारी राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललं असल्याचं ते म्हणाले. चार राज्यातून येणाऱ्या ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांचं बोरिवली, मुंबई सेट्रेल, दादर, वांद्रे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला या ठिकाणी हजारो प्रवशांची रोज स्क्रिनिंग होणार आहे. त्या ठिकाणी कोणामध्ये करोनाची लक्षणं आढळली तर त्यांची त्याच ठिकाणी चाचणी केली जाणार असल्याचंही चहल म्हणाले.

गर्दी टाळावी…

“नागरिकांनीही मास्कचा वापर करावा, गर्दी टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं. लोकांनी मास्कचा वापर केला, गर्दी टाळली तर आपण दुसऱ्या लाटेपासून वाचू शकतो,” असंही चहल म्हणाले. माझे कुटुंब माझी जबबादारी या अंतर्गत आपण जवळपास ३५ लाख कुटुंबीयांकडे दोन वेळा गेलो, तपासणीही केली. आम्ही मास्कसाठी ५ लाख लोकांना दंड केला. आपण दंडाची रक्कम कमी केली. आपला उद्देश लोकांकडून पैसे घेणं नाही तर त्यांना सवय लावावी हा आहे. लोकांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. लोकांनी केवळ मास्कशिवाय बाहेर पडू नये. आतापर्यंत आलेल्या पैशातून लोकांना मोफत मास्क वाटपही करण्याचा निर्णय झाल्याचं चहल म्हणाले.