खड्डे भरण्याच्या कामांची पाहणी

मुंबई : स्थायी समितीमध्ये दोनदा आणि मुख्य सभागृहात एकदा सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला खड्डय़ांवरून बोल लावल्यावर आणि कोल्ड मिक्सच्या उपयुक्ततेबाबत शंका उपस्थित केल्यावर शुक्रवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शहराच्या काही  भागात खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पडलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले. खड्डय़ांमुळे दुचाकीवरून जाणाऱ्यांचे अपघात झाले तसेच ताडदेव येथे पोलीस स्टेशनबाहेरील खड्डय़ात पडल्याने तरुणीला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली. खड्डय़ांबाबत चोहोबाजूंनी निषेध नोंदवला जात असताना तसेच नगरसेवकांनी पालिकेच्या कारखान्यात तयार होत असलेल्या शीत मिश्रणाचा उपयोग होत नसल्याचा आरोप केल्याच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त अजोय मेहता यांनी अखेर रस्त्यावर उतरत खड्डे भरण्याच्या पद्धतीची पाहणी केली. कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, शीव, माटुंगा, दादर, मुंबई सेंट्रल, ताडदेव, चिंचपोकळी या दक्षिण व मध्य मुंबईतील काही भागात आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसह भेट देऊन रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला.

शीतमिश्रणाचा उपयोग केवळ पालिकेचे कर्मचारी करत असून मोठय़ा रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम खासगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील १९०० किलोमीटरपैकी ६०० किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे काम सुरू असल्याने किंवा ते हमी कालावधीत असल्याने त्यांच्या संबंधित कंत्राटदारांनी खड्डे बुजवणे अपेक्षित आहे. मात्र या खासगी कंत्राटदारांना शीतमिश्रण वापरण्याचे बंधन नाही.

स्थायी समिती व सभागृहात नगरसेवकांनी वारंवार खड्डय़ांचा मुद्दा मांडला, मात्र रस्त्यावर फारसे खड्डे नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पाऊस गेल्या मंगळवारी थांबला आहे, त्यानंतर दहा दिवसांनी आयुक्तांना खड्डय़ांची आठवण आली. त्यांना आधीच आठवण झाली असती तर कदाचित ताडदेवला खड्डय़ात पडून तरुणी गंभीर जखमी झाली नसती, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी दिली.

प्रशासनाला खूपच उशिरा जाग आली आहे. ४८ तासात खड्डे बुजवू अशी गेल्या गुरुवारी घोषणा झाल्यावर सर्व अतिरिक्त आयुक्तांनी रस्त्यावर उतरून पाहणी केली असती तर ही समस्या एवढी वाढली नसती.

उशिरा का होईना, पण प्रशासन जागे झाले असले तर शीत मिश्रणाचा कितपत उपयोग होतो आहे ते त्यांनी जरूर पाहावे, असे सपचे गटनेता रईस शेख म्हणाले.