“मिडल इस्ट, प्रामुख्यानं संयुक्त अरब अमिरातीतील दुबईवरून येणाऱ्या लोकांच्या चाचण्या आपण विमानतळांवर केल्या असत्या तर आज मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी असण्याची शक्यता असती,” असं मत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी व्यक्त केलं. ‘करोना लढ्यातील शिलेदारांशी संवाद’ या लोकसत्तानं आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते संवाद साधत होते.

करोनामुळे ओढवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीशी मुंबई महापालिकेचे योद्धे जिवाची पर्वा न करता लढत आहेत. या योद्ध्यांचे शिलेदार असलेल्या परदेशी यांच्याशी या लढाईविषयी जाणून घेण्याची संधी अनेक दिग्गज आणि अनेक लोकांना ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून मिळाली.

“मुंबईत अचानक करोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्याचं पाहून आम्हालाही आश्चर्य वाटलं होतं. सुरूवातील केंद्र सरकारनं परदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये असेलेल्या देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिरातीचं नाव नव्हतं. त्यामुळे त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांचं विमानतळांवर स्क्रिनिंग करण्यात आलं नाही. तसंच १६ मार्च पर्यंत दुबईवरून येणाऱ्यांना क्वारंटाइनचीही सक्ती नव्हती. प्रामुख्यानं दुबईतून आणि मिडल ईस्टमधून मुंबईत आलेल्यांची संख्या जास्त आहे. सुरूवातीला युएई वगैरे नसलं तरी नंतर त्या देशांची नाव या यादीत टाकण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील युएईला या यादीत टाकण्यात यावं सुचवलं होतं,” असं परदेशी म्हणाले. “धारावी आणि आसपासच्या ठिकाणी ज्या करोनाग्रस्तांशी संख्या वाढली ते या लोकांच्या संपर्कात आल्यानं वाढली असल्याची शक्यता आहे. दुबईवरून येणाऱ्यांचं पहिल्यापासून स्क्रिनिंग झालं असतं तर मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा कमी राहिला असता,” असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

पालिकेकडे कोविड १९ चाचणीचं मशीन
“अनेक ठिकाणी कोविड-१९ च्या चाचण्या केंद्र सरकारच्या लॅबमधून करण्यात येतात. पण मुंबई महानगरपालिका ही पहिशी महानगरपालिका आहे जिनं स्वत:चं करोना चाचणी करणारं मशीन घेतलं आहे. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात अनेक चाचण्या होत आहेत. आज दिवसाला ३०० चाचण्या या ठिकाणी होत आहेत, असं परदेशी म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आपण हे मशीन विकत घेतलं होतं,” असंही त्यांनी सांगितलं.