मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचं करोनामुळे निधन झालं आहे.मुंबई महापालिकेच्या एच/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र करोनाची बाधा झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सून आणि एक भाऊ तसंच दोन बहिणी असा परिवार आहे. ते ५७ वर्षांचे होते.

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २४ प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी १३४ दिवसांवर पोहोचलेला आहे आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही ०.५ % असा मुंबईतच नाही तर कदाचित देशात देखील सर्वोत्तम आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते. या प्रयत्नांमध्ये अशोक खैरनार यांचा मोठा वाटा होता.

धुळे महानगरपालिका हद्दीतील मोहाडीचे मूळ रहिवासी असलेले श्री. खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि ‘आय. आय. टी. पवई’ या सुविख्यात संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. अशोक खैरनार हे फेब्रुवारी १९८८ पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी २०१८ पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून श्री. अशोक खैरनार यांना तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते ‘जानेवारी २०१९’ साठी ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते.