मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी दुपारी पुढील आर्थिक वर्षाचा ३७,०५२.१५ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती समोर सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी २८०६.८० कोटींची तरतूद करण्यात आली असून, नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गासाठी (कोस्टल रोड) १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेलाही प्राधान्य देत महापालिकेने अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद केली आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विभागासाठी ३६९३.२४ कोटी रुपयांची, तर शिक्षण विभागासाठी २३९४.१० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पाणी पुरवठा व मलनि:सारणासाठी ५५६९.८३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आला आहे, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी २५१२.२२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईतील रस्त्यांवर एलईडी दिवे, पर्जन्य जलवाहिन्या, मानवी दुग्धपेढी, उद्याने, पालिकेच्या मंडया इत्यादींसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेस्ट उपक्रमासाठी महापालिका १० कोटींचे कर्ज देणार आहे.

अर्थसंकल्पातील तरतूदी-
* सागरी किनारा रस्त्यासाठी (कोस्टल रोड) १ हजार कोटी
* शहरातील रस्त्यांसाठी २८०६.८० कोटी
* एलईडी दिव्यांसाठी १० कोटी
* पर्जन्य जलवाहन्यांसाठी १४०८.४८ कोटी
* राजावाडी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन रुग्णालयांमध्ये दुग्धपेढी
* देवनार पशुगृहासाठी १३७.९५ कोटी
* कचऱ्याबद्दलच्या जनजागृतीसाठी १५ कोटी
* उद्यानांसाठी ५२३ कोटी
* घनकचरा व्यवस्थापनासाठी २५१२.२२ कोटी
* स्मार्ट सिटीसाठी १० कोटी
* गोरेगाव-मुलुंड लिंगरोडसाठी १३० कोटी
* सार्वजनिक शौचालयासाठी ७५ कोटी
* डम्पिंग ग्राऊंटवरील कचाऱयाच्या प्रक्रियेसाठी २८ कोटी
* हँकॉक ब्रिजच्या बांधकामासाठी १० कोटी
* स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासाठी ८०.८९ कोटी
* विद्यार्थ्यांच्या टॅबसाठी १४ कोटी ३१ लाख
* कॉम्युटर लॅब निर्मितीसाठी १७ कोटी ६८ लाख
* व्हर्च्युअल क्लासरुमसाठी १५ कोटी ८८ लाख

पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत-
* जकातीतून ६८९५ कोटी रुपये उत्पन्न मिळणार
* मालमत्ता करातून ४९५६.१८ कोटी
* जल व मलनिस्सारण करांतून १२४४.३४ कोटी
* विकास नियोजन खात्याकडून ६,२८४ कोटींची प्राप्ती
* अनुदाने २४०० कोटी
* विकास निधीतून अंशदान ६२७ कोटी
* इतर प्राप्ती १८४२.७३ कोटी