News Flash

बदल्यांचे वादळ

मुंबई आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांची उचलबांगडी

(संग्रहित छायाचित्र)

इक्बालसिंग चहल नवे महापालिका आयुक्त

अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल अतिरिक्त आयुक्तपदी

मुंबईत करोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आलेल्या नापसंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. या पदावर त्यांच्या जागी इक्बालसिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करून मुंबई पालिकेची धुरा नव्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली.

आयुक्त प्रवीण परदेशी यांची मंत्रालयात नगरविकास विभागाचे सचिव (१) या पदावर बदली करण्यात आली. तर महापालिका आयुक्तपदी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव इक्बालसिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली. या पदावर अलीकडच्या काळात अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. चहल हे प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी आहेत.

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती होण्यापूर्वी चहल यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव तसेच म्हाडा आणि राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी आदी पदांवर काम केले आहे.

भिडे आणि संजीव जयस्वाल या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन अधिकाऱ्यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. विद्यमान अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, तर जयश्री भोज यांची राज्य लघु उद्योग विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली.

अश्विनी भिडे यांनी यापूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाच्या अतिरिक्त आयुक्त  आणि मेट्रो रेल कार्पोरेशनच्या माध्यमातून मुंबईत बरीच वर्षे काम केले असून जयस्वाल यांनीही ठाणे महापालिका आयुक्त म्हणून काम केल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा मुंबईत फायदा होऊ शकेल. करोनामुळे राज्याची ढासळणारी अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान असल्याने मनोज सौनिक यांच्याकडे वित्त विभागाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला. त्यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला.

नक्की झाले काय?

करोनाच्या साथीला अटकाव करण्यासाठी पालिका प्रभावी उपाययोजना करीत नसल्याची तक्रोर केंद्र सरकारच्या पथकाने के ली होती. केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी पालिकेकडून होत नसल्याचेही सध्या मुंबईत असलेल्या केंद्रीय पथकाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यानंतरच मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:33 am

Web Title: mumbai municipal corporation commissioner praveen pardeshi was abruptly replaced on friday abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अंतिम वर्ष वगळता विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द
2 एक लाख ऊसतोड मजुरांचे सुरक्षित स्थलांतर
3 पोलिसांनी पिटाळल्याने हजारोंची माघार
Just Now!
X