News Flash

नगरसेवकांची नव्या प्रभागांत ‘मशागत’

संभाव्य प्रभाग त्याच पक्षाच्या नगरसेवकाकडे असल्यास विशेष अडचणी येत नाहीत.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

प्रभागांची बदललेली रचना व आरक्षण यामुळे पाच वर्षे ‘मशागत’ केलेला प्रभाग सोडण्याची वेळ आलेल्या नगरसेवकांनी त्यांच्या भावी प्रभागांमध्ये जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य नव्या प्रभागात विविध कामे करून संपर्क वाढवण्यासाठी नगरसेवक क्लृप्त्या वापरत असून लहान-मोठी नागरी कामे करण्यापासून गुणगौरव स्पर्धा, कार्यक्रमाचे मोफत पास देण्यापर्यंत कल्पना लढवल्या जात आहेत.

शहरातील २२७ प्रभागांची लोकसंख्येनुसार फेररचना केल्यानंतर सर्वच प्रभागांच्या सीमारेषा आणि आरक्षणात बदल झाला आहे. त्यामुळे पुन्हा उभे राहण्यास इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी आजूबाजूचे विभाग चाचपण्यास सुरुवात केली आहे.काही अनुभवी नगरसेवकांनी या कल्पना प्रत्यक्षात राबवण्यास सुरुवात केली आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून नवीन नगरसेवकाकडे प्रभाग सुपूर्द होईपर्यंत विद्यमान नगरसेवकाकडेच प्रभागाचे काम राहते. दुसऱ्या नगरसेवकाच्या प्रभागात स्वत:चा नगरसेवक निधी वापरून नागरी कामे करण्यासाठी त्याचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते, असे शिवसेनेच्या कुर्ला येथील नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी सांगितले. मात्र या कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत.

संभाव्य प्रभाग त्याच पक्षाच्या नगरसेवकाकडे असल्यास विशेष अडचणी येत नाहीत. काही वेळा वेगळ्या पक्षातील नगरसेवकाकडे प्रभाग असला तरी आरक्षणामुळे त्यालाही त्या प्रभागात उभे राहता येत नसल्याने परस्पर सामंजस्याने कामे, उद्घाटने केली जात आहेत. वॉर्ड अधिकारी व इतर प्रभागांतील नगरसेवकांशी संधान साधून गरीब वस्तीत विविध कामांना सध्या जोर आला आहे, असे काँग्रेसचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले.

बालक-पालक मेळावे, विद्यार्थी गुणगौरव

शिवसेनेच्या परळ येथील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग दुभागला गेला असून, तिथे मागासवर्गीय व अनुसूचित जातीचे आरक्षण आल्याने त्या आता १९४ व १९९ या खुल्या व महिला सर्वसाधारण विभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यातील १९९ क्रमांकाचा प्रभाग हा महापौर स्नेहल आंबेकर यांचा आहे. ‘महापौरांच्या प्रभागातील रहिवाशांच्या लहान-मोठय़ा समस्या सोडवण्यासाठी मी वेळ दिला आहे. आताही बालक-पालक मेळावे, विद्यार्थी गुणगौरव अशा कार्यक्रमांमधून मी संपर्क साधत आहे,’ असे पेडणेकर यांनी सांगितले.

दांडियाचे मोफत पास, दिवाळीत उटणे

मालाड येथील भाजपाचे नगरसेवक व शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष विनोद शेलार यांच्या मतदारसंघाच्या भौगोलिक सीमा वाढल्या आहेत. हा वाढलेला परिसर उच्च मध्यमवर्गीयांचा असून त्यात गुजराती व जैन समाजाचे प्राबल्य आहे. त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक डॉ. राम बारोट व ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या प्रभागातील काही भाग शेलार यांच्या प्रभागात आल्याने त्यांना जनसंपर्क वाढवण्यासाठी विशेष अडचणी आलेल्या नाहीत. ‘प्रभागात समाविष्ट झालेल्या नव्या भागांत मी नवरात्रीत दांडियाचे आयोजन करून त्याचे मोफत पास वाटले होते. दिवाळीतही उटणे वाटून घरोघरी नाव पोहोचवण्याचा प्रयत्न आहे,’ असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:47 am

Web Title: mumbai municipal corporation election election campaign
Next Stories
1 नवदुर्गाच्या गौरवाचा संगीतमय सोहळा
2 अंधेरी-विरार फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ
3 वाहनतळाचा तीन तिघाडा
Just Now!
X