मुंबईमध्ये कारवाईबाबत दिरंगाई
मुंबई : मानखुर्द, देवनार, चेंबूर भागांतील ८० खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. परंतु ही तपासणी झालेली नसून यासंबंधी पालिकेनेही कोणतीही कारवाई केलेली नाही.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील दाटीवाटीच्या भागांमध्ये उभारलेली खासगी नर्सिग होम आणि आणि याचे संभाव्य धोके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एम पूर्व विभागातील ३६ नोंदणीकृत आणि २४ अनोंदणीकृत खासगी रुग्णालये आहेत. यांच्याकडे अग्निसुरक्षाविषयक ना हरकत प्रमाणपत्र नसल्याची तक्रार पालिकेला केली होती. यावर पालिकेने देवनार विभागाला सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश जानेवारी २०१८ला दिले होते. या घटनेला आता तीन वर्षे झाली तरी अद्याप या नर्सिग होम्सवर कोणतीही कारवाई पालिकेने केलेली नाही. अधिकार फाऊंडेशनने पोलिसांमध्ये याची तक्रार ऑक्टोबर २०२० मध्ये दिली होती. या तक्रारीनुसार कार्यवाही करण्याचे आदेशही शिवाजीनगर पोलीस ठाण्याने एम पूर्व विभागाच्या साहाय्यक आयमुक्तांना दिले आहेत. परंतु तरीही याबाबत कोणतेही पाऊल पालिकेने उचलले नाही.
पालिकेच्या आदेशानंतर या रुग्णलयांची अग्निशमन दलाने तपासणी करून काही बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. ही पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन या रुग्णालयांना तत्कालीन विभागीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तीन वर्षांची मंजुरी दिली आहे. जेव्हा की दरवर्षी यांची तपासणी केली जाऊन मुदतवाढ दिली जाते. ही मुदतदेखील आता मार्च २०२० मध्ये संपली आहे. यासंबंधी अग्निसुरक्षा विभागालाही तपासण्या करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु त्यांच्याकडून काही उत्तर न आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये झालेल्या आगीच्या घटनेनंतर पालिकेच्या सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केले आहेत. यात विभागाने नमूद केलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांबाबत निदर्शनास आणल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 4:21 am