कॅम्पा कोलामधील अनधिकृत घरे रिकामी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतरही अद्याप एकाही रहिवाशाने घराचा ताबा पालिकेकडे दिलेला नसल्यामुळे आता मुंबई महापालिका सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत पालिका याबाबत निर्णय घेणार आहे.
पालिकेने दोन जूनपर्यंत चावी परत करण्याची मुदत दिली होती, तरी सोमवारीही रहिवाशांनी चाव्या दिल्या नाहीत. सर्व रहिवाशांचे लक्ष मंगळवारी होत असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लागले आहे. नोव्हेंबरमध्ये अनधिकृत घरे तोडण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेत कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना ३१ मेपर्यंत घरे रिकामी करण्याची मुदत वाढवून दिली होती. गेल्या सहा महिन्यांत कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी पुन्हा पालिकेकडे विनंती केली, नगरसेवकांनीही प्रशासनाला कॅम्पाकोलाबाबत सहानुभूतीने विचार करण्याचा सल्ला दिला. मात्र, दोन जूनपर्यंत घरे रिकामी करून पालिकेकडे चाव्या जमा कराव्यात, अशी नोटीस महानगरपालिकेकडून २६ मे रोजी पाठवण्यात आल्या.