पालिकेला सहा कोटींचा अतिरिक्त खर्च; डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबई महापालिकेने सुमारे दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या सातपैकी एका रस्त्याच्या कामाचा अंदाज चुकला असून डांबरीकरणाऐवजी आता या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि पर्जन्य जलवाहिनीऐवजी पेटिका वाहिनी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रस्त्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेत हे बदल करणे रस्ते विभागाला भाग पडले आहे. त्यामुळे आता पालिकेला सहा कोटी रुपयांची अतिरिक्त फोडणी बसणार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील पी. ठाकूरदास मार्ग, डी. सुखडवाला मार्ग, तुल्लक मार्ग, वॉल्टन मार्ग, हेन्सी मार्ग, गार्डन मार्ग, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग या सात डांबरी रस्त्यांची मजबुती आणि सुधारणांचे काम हाती घेण्याचा निर्णय रस्ते विभागाने घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून १९ कोटी ६२ लाख ७० हजार रुपयांचे कंत्राट फोर्स कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यावर शिक्कामोर्तब केले. प्रशासनाने याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने ७ एप्रिल २०१८ रोजी मंजुरी दिली आणि १४ मे २०१८ रोजी या कामाला सुरुवात झाली. निविदेमधील अटीनुसार पावसाळा वगळून १६ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.

या रस्त्यांपैकी सहा रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र सर विठ्ठलदास ठाकरसी मार्गाची भौगोलिक स्थिती आता पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. या रस्त्याची लांबी १,१०५ मीटर, तर रुंदी १२ मीटर आहे. मूळ प्रस्तावानुसार या रस्त्याचे डांबरीकरण आणि पदपथाची दुरुस्ती करण्यात येणार होती. तसेच १४०० मिलिमीटर आणि १८०० मिलिमीटर व्यासाच्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या. परंतु आता डांबरीकरणाऐवजी या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे आणि पर्जन्य जलवाहिन्यांऐवजी २.२ मीटर बाय १.२ मीटरची काँक्रिट पेटिका वाहिनी बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सेवा उपयोगित कंपन्यांच्या कामांसाठी रस्त्यालगतच्या पट्टीचे डांबरीकरण करण्यात येते. मात्र सर विठ्ठलदास ठाकरसी मार्गालगतच्या पट्टीचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरविले आहे. परिणामी या कामाचा खर्च वाढला आहे. मूळ प्रस्तावात सात रस्त्यांच्या कामांसाठी पालिकेला १९ कोटी ६२ लाख ७० हजार रुपये खर्च येणार होता. परंतु आता अतिरिक्त ६ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्चाचा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार आहे. त्याशिवाय हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.

मुळ प्रस्ताव तयार करताना या रस्त्याची भौगोलिक स्थिती लक्षात न घेताच कामाचा मसुदा तयार करण्यात आल्याचे उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.