किल्ला परिसराच्या सुशोभीकरणाची महापालिकेची योजना; १९ कोटींचा खर्च

मुंबई : माहीमची खाडी अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोर्तुगिजांनी बांधलेल्या वांद्रे किल्ल्याची दुरवस्था झाली असून वांद्रे किल्ला परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पडझड झालेल्या भिंतींची पुनर्बाधणी करतानाच किल्ल्याच्या सुशोभीकरण करण्याची पालिकेची योजना आहे. त्याचबरोबर शहर वनीकरणाचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सुमारे १९ कोटी ११ लाख रुपये खर्च करून ही योजना राबविण्यात येणार असून येत्या दीड वर्षांमध्ये वांद्रे किल्ला कात टाकून नव्या रूपात मुंबईकरांसमोर येण्याची चिन्हे आहेत.

माहीमची खाडी सुरक्षित बनविण्यासाठी पोर्तुगिजांनी सात बेटांच्या मुंबईत किनाऱ्यालगत उत्तरेला वांद्रे किल्ला, तर दक्षिणेला वरळी किल्ला उभा केला. या दोन किल्ल्यांमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने माहीम खाडीवर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतावर राज्य गाजविले. ब्रिटिशांची गुलामगिरी झुगारून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला. अखेर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. कालौघात मुंबईमधील किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले. किल्ल्यांची काही भागातील तटबंदी ढासळली, निर्जन किल्ले प्रेमीयुगुलांचे अड्डे बनले. वांद्रे किल्ल्याचीही अवस्था अशीच आहे. ही बाब लक्षात घेत पालिकेने वांद्रे किल्ल्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशोभीकरण योजनेत मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंतीचे निष्कासन, सुरक्षा भिंतीची पुनर्बाधणी, शोभिवंत जाळी बसविणे, प्रवेशद्वार सुशोभित करणे, शौचालय बांधणे, गांडूळ खतनिर्मितीसाठी खड्डा खोदणे, अंतर्गत बेसाल्ट दगडाचे पदपथ बांधणे, पुरातन वास्तूच्या अनुषंगाने दिशा-चिन्हे आणि नाव-पट्टी बसविणे, जल ठिकाणे बांधणे, खराब झालेली बैठक व्यवस्था दुरुस्त करणे, मैदानात विद्युत दिवे बसविणे, हिरवळीची कामे आणि शहर वनीकरण आदींचा समावेश आहे. या कामांसाठी अंदाजे २० कोटी ६२ लाख ६५ हजार रुपये खर्च पालिकेला अपेक्षित होता. या कामासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत १५ टक्के कमी दराने निविदा सादर करणाऱ्या कंत्राटदाराला १९ कोटी ११ लाख ४ हजार रुपयांचे कंत्राट देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.