मध्यवर्ती भागात कोठाराची व्यवस्था

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईमधील अनेक इमारती, परिसर प्रतिबंधित करण्यात आले असून अशा भागांतील नागरिकांच्या अन्नपुरवठय़ाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने धान्याच्या वितरण व्यवस्थेसाठी २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत पथकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. तसेच धान्याचा साठा करण्यासाठी मध्यवर्ती भागात कोठाराचीही व्यवस्था करण्यात येत आहे.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली असून नवे रुग्ण सापडताच संबंधित इमारत वा परिसर प्रतिबंधित करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. प्रतिबंधित इमारती आणि परिसरांची संख्या २५० च्या वर पोहोचली आहे. प्रतिबंधित भागांमधील नागरिकांना बाहेर जाता येत नाही, तर बाहेरील व्यक्तीला या क्षेत्रात प्रवेश मनाई आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या भागातील नागरिकांना घरातच बसण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रतिबंधित भागातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू घरी पोहोचविण्याची जबाबदारी पालिकेने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. आतापर्यंत जी-उत्तर विभागातील प्रतिबंधित क्षेत्रात १० हजार, जी-दक्षिणमध्ये आठ हजार धान्याच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याशिवाय अन्य विभाग कार्यालयांच्या मागणीनुसार ही पाकिटे पुरविण्यात येत आहेत. धान्याची वाढती मागणी लक्षात घेत त्याच्या वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सामाजिक संस्थांकडून उपलब्ध होणारा साठा मध्यवर्ती ठिकाणी जमा करण्याचा विचार सुरू आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय देणार?

गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या हेल्पलाइनवर धान्याच्या पाकिटांची मागणी वाढत आहे. तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, तेल, मीठ, मसाला, हळद, चहाची भुकटी, साखर आदी १० ते १२ वस्तूंचा समावेश असलेले सुमारे १५ किलो वजनाचे धान्याचे पाकीट प्रतिबंधित विभागातील रहिवाशांच्या घरी मागणीनुसार पोहोचविण्यात येत आहे.

पालिके ची हेल्पलाइन – १८००२२१२९२