प्रभाग आरक्षण बदलाचा मनसेला मोठा फटका; वर्चस्व असलेल्या प्रभागांतूनच हद्दपार होण्याची भीती

प्राजक्ता कासले, मुंबईपाच वर्षांपूर्वी तब्बल पहिल्याच फटक्यात २७ जागा पदरात पाडून मुंबई महापालिकेत सीमोल्लंघन केलेल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’बाबत (मनसे) यंदा म्हणावी तशी अनुकूल राजकीय परिस्थिती नाही. त्यात नव्याने आखल्या गेलेल्या प्रभागांचा व आरक्षणाचा फटका या पक्षाला बसणार आहे. हा घाव इतका वर्मी बसणार आहे की, पाच वर्षांत पालिका गाजविणाऱ्या या पक्षाच्या अनेक नेत्यांना अनुकूल मतदारसंघ शोधताना नाकीनऊ येणार आहे. विधानसभेवेळी मिळालेल्या मतांचे गणित लक्षात घेता तर भांडुप, घाटकोपर, बोरिवली या पक्षाचा वरचष्मा असलेल्या पट्टय़ांतही प्रभागांचे तुकडे पडल्यामुळे मनसेसाठी आगामी निवडणूक आव्हानात्मक असणार आहे.

फारसे ओळखीचे चेहरे नसतानाही पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भाषणे व ‘खळ््ळखटय़ाक’च्या करिश्म्यावर २०१२च्या निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. महत्त्वाचे म्हणजे त्यातील सात नगरसेवकांनी थेट दादरमध्ये, सेनेच्या परंपरागत प्रभागात मनसेचा झेंडा रोवला. भांडुप, घाटकोपर आणि बोरिवलीतूनही प्रत्येकी तीन उमेदवार नगरसेवकपदी विराजमान झाले. भायखळा, वरळी, साकीनाका, चांदिवली, पवई, कन्नमवार, मुलुंड, सांताक्रूझ पूर्व व पश्चिम, जोगेश्वरी, मालाड येथून प्रत्येकी एकाला नगरसेवकपदाची लॉटरी लागली. परंतु आता प्रभागांच्या बदललेल्या रचनेचा मोठा फटका या पक्षाला बसण्याची शक्यता आहे.पाच वर्षांपूर्वी सेनेची परंपरागत मते पटकावून अनेक ठिकाणी मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र आता पुन्हा एकदा प्रभागांची रचना बदलली गेल्याने सेना, मनसेच्या मतांची सरमिसळ होऊ शकेल. अर्थात आता पाच वर्षांनंतर मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेची केविलवाणी अवस्था झाली तर विधानसभा निवडणुकीत अवघा एक आमदार तोही स्वबळावर निवडून आला. या स्थितीत पुन्हा एकदा पालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना बदललेल्या प्रभाग रचनेचाही भार मनसेला झेलावा लागणार आहे.

माहीम ते वरळी

गेल्या निवडणुकीत मनसेला भरभरून हात देणाऱ्या माहीम ते वरळी या सातही प्रभागांच्या सीमारेषा बदलल्या आहेत. इथले सर्वच प्रभाग दोन ते तीन वेगवेगळ्या प्रभागांत विभागले गेले असून मूळ सातऐवजी आता सहाच प्रभाग उरले आहेत. पूर्वीच्या १८१ ते १८७ या सलग प्रभागांऐवजी १८२ आणि १९० ते १९४ असे वेगळे क्रमांक असलेले प्रभाग पाडले गेले असून त्याचा सर्वात मोठा फटका मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांना बसला आहे. त्यांचा १८५ हा प्रभाग रवींद्र नाटय़मंदिर, शिवाजी पार्क या परिसरांत येत होता. आता तो फुटून बराचसा भाग १९१ क्रमांकाच्या प्रभागात आला आहे. मात्र १९१ या क्रमांकाच्या आधीच्या प्रभागावर (म्हणजे वरळी- गांधीनगर, डॉन मिल्स) गेल्या दोन निवडणुकांमध्ये महिलांचे आरक्षण नसल्याने या वेळी हा प्रभाग महिलांसाठी थेट आरक्षित करण्यात आला व तो क्रमांक शिवाजी पार्कला आल्याने मूळचा १८५ क्रमांकाचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला. गेल्या निवडणुकीसाठी स्वत:चा प्रभाग संदीप देशपांडे यांना दिलेल्या संतोष धुरी यांना मात्र या वेळी बदललेल्या प्रभाग क्रमांकाचा फायदा मिळत पुन्हा एकदा १९४ (आधीचा १८७) या खुल्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी आहे. या सात प्रभागांमध्ये पूर्वी तीन खुले प्रभाग, दोन मागासवर्गीय खुले व दोन महिला मागासवर्गीय प्रभाग होते. त्याऐवजी आता दोन खुले प्रभाग, दोन महिला, एक मागास सर्वसाधारण व एक मागास महिलांसाठी राखीव आहे.

१४ पैकी ११ महिला, उमेदवार शोधताना नाकीनऊ

भांडुप, मुलुंडचा काही भाग असलेल्या एस वॉर्डमध्ये मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. आता या भागांत आणखी एका प्रभागाची भर पडली आहे. मात्र नव्या आरक्षणात पूर्व व पश्चिम भाग वेगळे केल्याने गरीब व श्रीमंत वस्ती आपोआप दुभागली गेली आहे. या भागाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातील १४ प्रभागांपैकी ११ प्रभागांवर महिला आरक्षण आहेत. त्यामुळे १३ पैकी १० जागांवर पुरुष नगरसेवक असलेल्या या विभागांत महिला नगरसेवक शोधण्यासाठी सर्वच पक्षांची धावाधाव होईल.

बोरिवलीत बदललेली रचना मारक

बोरिवलीत मनसेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यातील प्रकाश दरेकर यांनी आधीच भाजपला जवळ केल्याने मनसेची एक जागा गेली आहे. बोरिवलीत प्रभागांच्या संख्येत बदल झाला नसला तरी प्रभागांची रचना बदलल्या आहेत. त्यातही श्रीमंत-गरीब असा भेद केल्याचा आरोप मनसे करत आहे. येथील कोणत्याही नगरसेवकाने पालिकेच्या सभागृहात विशेष कामगिरी केली नसल्याने मनसेला या भागात नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागेल.