संदीप आचार्य

करोनाकाळात खासगी रुग्णालयांकडून लूट सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मुंबई पालिकेला रुग्णांच्या लुबाडणुकीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी स्वतंत्र मेल आयडी जाहीर करण्यास सांगितले आहे. तसेच पाच आयएएस अधिकाऱ्यांना नियमितपणे मोठय़ा खाजगी रुग्णालयांना भेट देण्यास व या सर्व रुग्णालयांत पालिकेच्या लेखा विभागाचे एकेक अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे.

मुंबईतील लीलावती, बॉम्बे, जसलोक, हिंदुजा, नानावटी, सोमय्या आदी बडय़ा पंचतारांकित रुग्णालयात व ट्रस्ट रूग्मालयांमध्ये करोना काळात रुग्णांकडून भरमसाठ शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सरकारने ३० एप्रिल रोजी ‘एपिडेमिक अ‍ॅक्ट १८९७’ अन्वये व अन्य कायद्यांचा वापर करून रुग्णालयांनी किती दर कोणत्या आजारासाठी वा शस्त्रक्रियेसाठी घ्यावा हे निश्चित केले होते. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिका क्षेत्रात महापालिकांची तर अन्यत्र आरोग्य विभागाची असताना मुंबईत पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी माध्यमातूनही याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होऊनही अजिबात दखल घेतली नाही की कारवाई केली. एवढेच नाही तर २१ मे रोजी खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा आदेश सरकारने काढल्यानंतर गेल्या १४ दिवसात आयुक्त चहल यांनी बडय़ा रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप करत भाजपने थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.

याबाबत मुख्य सचिव अजोय मेहता यांना विचारले असता, पालिकेतील पाच आयएएस अधिकाऱ्यांना मोठय़ा खाजगी रुग्णालयात रोज भेट देण्यास सांगितले जाईल तसेच रुग्णांच्या लुटमार वा अन्य तक्रारी दाखल करून तात्काळ कारवाईसाठी स्वतंत्र मेल जाहीर केला जाईल. या मेल आयडीवर रुग्णांना तक्रारी दाखल करता येतील. तसेच या प्रमुख मोठय़ा रुग्णालयात पालिकेच्या लेखा विभागातील एक अधिकारी यापुढे खाजगी रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या देयकांची तपासणी करेल, असे मुख्य सचिवांनी सांगितले. याची तात्काळ अंमलबजावणी करण्यास आपण पालिका आयुक्तांना सांगितल्याचे मुख्य सचिवांनी  स्पष्ट केले.

मुख्य सचिवांकडून कारवाईचा इशारा

३० एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ज्या रुग्णालयांनी देयक आकारले नसेल त्यांचीही तपासणी केली जाऊन अतिरिक्त शुल्क आकारणी झाली असेल तर संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले. रुग्णालयांनी आपली फसवणूक केली व जादा शुल्क घेतले असे वाटत असेल त्या रुग्णांनी पालिकेच्या मेलवर आपली तक्रार दाखल करावी. खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा लवकरात लवकर ताब्यात घेण्याबाबत आपण आयुक्तांशी बोलू असेही मेहता यांनी सांगितले.