मुंबई : सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचे उत्पन्न टाळेबंदीमुळे घटले आहे. पहिल्या सहा महिन्यांतच ४१ टक्क्य़ांची घट निर्माण झाल्याने खर्च भागवण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याचा विचार पालिका करीत आहे.

तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी फेब्रुवारी महिन्यात पालिकेचा २०२०—२१ या आर्थिक वर्षांचा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र त्यानंतर महिन्याभरातच मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागला आणि देशभरात टाळेबंदी लागू झाली. एप्रिलपासून नवीन अर्थसंकल्प लागू होण्याच्या आधीच संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या आर्थिक वर्षांतील कर आणि शुल्कांची वसुलीही पूर्ण होऊ शकली नाही. नवीन आर्थिक वर्षांत तर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी गत झाल्यामुळे सगळेच नियोजन बिघडले आहे.

चालू आर्थिक वर्षांत पालिकेला २८,४४८.३० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. जकातीपोटी नुकसान भरपाई, मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क व अधिमूल्य, गुंतवणूकीवरील व्याज, राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान अशा विविध मार्गाने हे उत्पन्न येत असते. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यात ८,३२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र अद्याप केवळ ४,९०५  कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर आतापर्यंत करोनाच्या व्यवस्थापनासाठी व अन्य गोष्टींसाठी ३,८०९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. अद्याप करोनास्थितीत सुधारणा झालेली नसून सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी किती कालावधी लागेल हे सांगणे अवघड झाले आहे. त्यामुळे बँकामधील ठेवींमधून पाच हजार कोटी रुपये काढण्यात येणार असल्याचे समजते. यंदाच्या अर्थसंकल्पातून ४,३८० कोटींच्या ठेवींतून निधी घेण्याची तरतूद करण्यात आली होती.