मुंबईत आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्यांना प्राधान्य

मुंबई : भारतात करोनाप्रतिबंधक लस पुढील वर्षांच्या सुरुवातीला येण्याची शक्यता असल्यामुळे या लशीच्या वितरणात आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्यांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने नियोजन सुरू के ले आहे. त्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतून संकलित केलेल्या माहितीचा वापर करण्यात येणार आहे.

भारतात येत्या काही महिन्यांत एकापेक्षा जास्त लशी बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी के ली. भारतात लोकसंख्या जास्त असल्यामुळे या लशींच्या वितरणाचेही नियोजन करावे लागणार आहे. या नियोजनासाठी केंद्रीय पातळीवर नियोजनाचा आराखडा तयार केला जात आहे. मात्र मुंबई महापालिकेनेही आपल्या पातळीवर नियोजन सुरू केले आहे.

लशीच्या वितरणासाठी अद्याप अधिकृत आराखडा महापालिकेने तयार के ला नसला तरी पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड विकार अशा दुर्धर आजारांचा समावेश असलेल्यांना प्राधान्य देण्याचा विचार करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईची लोकसंख्या १.४० कोटी गृहीत धरली तरी त्याच्या साधारण १० टक्के म्हणजेच १४ लाख नागरिक या वर्गातील असतील. त्यांना सर्वात आधी ही लस देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी पालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये, पालिकेचे दवाखाने यांची मदत घेतली जाणार आहे. सध्या मुंबईत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. त्यानुसार घरोघरी जाऊन रहिवाशांची आरोग्यविषयक तपासणी करण्याबरोबरच त्यांचे वय आणि आजारपणाची माहितीही संकलित केली जात आहे. या माहितीचाही पालिकेतर्फे नियोजनाच्या वेळी वापर केला जाणार आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेली हो मोहीम पूर्ण झाली की मग केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार आराखडा तयार केला जाणार आहे.

निकाल पाहून उत्पादन, वितरण

देशात सध्या तीन लशींवर संशोधन केले जात असून त्यापैकी सीरम इन्स्टिटय़ूट ‘ऑक्सफर्ड’च्या लशीवर संशोधन करीत आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी केली जात आहे. त्यासाठी मुंबईत पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत. केईएममध्ये ८३ जणांवर तर नायरमध्ये ८० जणांना ही लस देण्यात आली आहे. एक महिन्यानंतर त्यांना पुन्हा लस देऊन त्यांचे काही महिने निरीक्षण केले जाणार आहे. त्यानंतरही निकाल पाहून लशीचे उत्पादन व वितरण सुरू होणार आहे.

‘नागरिकांशी संपर्क साधू!’

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे मुंबईतील ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घ आजार असलेले नागरिक यांची माहिती उपलब्ध होऊ शकेल. लशीच्या वितरणावेळी या नागरिकांना संपर्क साधून त्यांना ही लस देता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

२२ हजार ७४२ पोलीस करोनामुक्त

मुंबई : राज्यात आतापर्यंत २५ हजार १३४ पोलीस अधिकारी, अंमलदार करोनाबाधित झाले आहेत. मात्र त्यापैकी २२ हजार ७४२ पोलीस करोनामुक्त होऊन कर्तव्यावर परतल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयातून देण्यात आली.

मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत मुंबई आणि भंडारा येथील दोन पोलीस अंमलदारांचा करोनाने मृत्यू झाला, तर ५५ पोलीस बाधित असल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत २५ अधिकारी आणि २३७ अंमलदारांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला. मंगळवापर्यंत राज्यात दोन हजार १३० पोलीस करोनावर उपचार घेत आहेत. अशा उपचाराधीन पोलिसांची संख्या मुंबई आणि नागपूर (शहर) येथे सर्वाधिक असल्याचेही मुख्यालयाने स्पष्ट के ले.