मुंबईत करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने संसर्ग नियंत्रणासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच अन्य नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले. नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेशही पालिकेने दिले असून, उपनगरी गाडय़ांमध्ये ३०० मार्शल्स नेमण्यात येणार आहेत.

मुंबईसह राज्यात करोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर चहल यांनी गुरुवारी सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे चर्चा केली. त्यावेळी आयुक्तांनी हे सर्व निर्देश दिले.

लक्षणे  नसलेल्या बाधित रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवण्यात येते. अशा रुग्णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारण्यात यावेत. तसेच त्यांची माहिती संबंधित सोसायटय़ांना कळवावी, नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून त्यांच्यावर बारीक नजर ठेवावी. अशा व्यक्तीशी दिवसातून पाच ते सहा वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून ते घरी असल्याची खातरजमा करावी. बाधित व्यक्तींची योग्य माहिती ठेवून त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

मंगल कार्यालये, जिमखाना/क्लब, नाईट क्लब, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मिय स्थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी एकावेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती जमल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधित आस्थापना, व्यवस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

लग्नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाईल. दररोज किमान पाच जागांची  तपासणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करुन लग्नाचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्यवस्थापनांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. रुग्णांची संख्या अधिक असलेल्या विभागांमध्ये ‘मिशन झिरो’च्या धर्तीवर कार्यवाही सुरु करावी. मोठय़ा संख्येने नवीन रुग्ण आढळणाऱ्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. एका बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान १५ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

ब्राझीलमधून येणाऱ्यांवर निर्बंध

केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे आता ब्राझीलमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनाही संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

आदेश काय?

* पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित

* गृहविलगीकरणातील नागरिकांच्या हातावर पुन्हा शिक्के

* मुखपट्टीविना रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी ३०० मार्शल

* मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्सची संख्या दुप्पट

* दररोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्य

* मंगल कार्यालये, क्लब, उपाहारगृह आदींची तपासणी

* ब्राझीलमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचेही संस्थात्मक विलगीकरण

* रुग्ण वाढत असलेल्या विभागांमध्ये चाचण्यांच्या संख्येतही वाढ

गेल्या वर्षी जून-जुलैच्या तुलनेत आजही मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात आहे. मात्र, करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे.

– इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त