वरळी, अॅन्टॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादरमध्ये
मुंबई : करोना संसर्गाच्या निर्मूलनासाठी मुंबई महापालिकेने ‘मिशन झिरो’ मोहीम हाती घेतली असून वरळी, अॅन्टॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादरमधील रुग्णांच्या शोधार्थ मोबाइल क्लिनिक व्हॅनद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
करोना रुग्णांची संख्या शून्य करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिका, भारतीय जैन संघटना, क्रेडाई – एमसीएचआय आणि देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन झिरो’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सात मोबाइल क्लिनिक व्हॅनद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम दक्षिण मुंबईत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गुरुवारी हरी बाग, मगन बाग कंपाऊंड, जैन मंदिराजवळ, सीताराम जाधव मार्ग, लोअर परळ (पश्चिम) येथे करण्यात आले.
मुंबईमधील काही भागात रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असून या विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शून्य करोना रुग्ण लक्ष्यांक गाठण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना नगरसेवक आशीष चेंबूरकर, क्रेडाई—एमसीएचआयचे माजी अध्यक्ष धर्मेश जैन, भारतीय जैन संघटनेचे (बी.जे.एस.) दक्षिण मुंबई अध्यक्ष अॅड. हसमुख भाई शहा, कुवर छेडा, जितेंद्र खिराणी आदी उपस्थित होते.
संशयित आढळल्यास तत्काळ स्वॅब चाचणी
‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत सात मोबाइल क्लिनिक व्हॅन दक्षिण मुंबईमधील वरळी, अॅन्टॉप हिल, डोंगरी, वडाळा, चर्नी रोड, गिरगाव, फोर्ट, कुलाबा, दादर या भागात धावणार आहेत. करोनाचे रुग्ण आढळणाऱ्या भागात जाऊन या क्लिनिक व्हॅनमधील डॉक्टर संशयित रुग्णांची तपासणी करणार आहेत. तपासणीदरम्यान करोनाबाधित संशयित आढळल्यास डॉक्टर तत्काळ त्याची स्वाब चाचणी करतील. एकही करोनाबाधित रुग्ण उपचाराअभावी राहू नये यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2020 12:39 am