इंद्रायणी नार्वेकर

विद्यार्थ्यांना टॅबवर शिक्षण देणारी पहिली महापालिका, अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या शाळांमधील तब्बल ६० हजार विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणप्रवाहाबाहेर आहेत. दुसरीकडे पालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून घेतलेले टॅब नादुरुस्त अवस्थेत धूळ खात पडले आहेत.

टाळेबंदीमुळे खासगी शाळांप्रमाणेच पालिकेच्या शाळांनीही मोबाइलवरून इंटरनेट आधारे ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र पालिकेच्या शाळेतील तब्बल ५० ते ६० हजार विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत.

रोजगार नसल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांसह स्थलांतरित झाले आहेत, तर जी मुले मुंबईत आहेत त्यापैकी अनेक मुलांच्या पालकांकडे अत्याधुनिक मोबाइल फोन नाहीत. त्यामुळे असे सुमारे ६० हजार विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दुरावले आहेत.

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेने मोठा गाजावाजा करून २०१५ मध्ये टॅब आणले. त्यानंतर पुढील वर्षी नववीच्या व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही टॅबची योजना सुरू झाली. सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना हे टॅब देण्यात आले होते. मात्र यातील बहुतांश टॅब बंद पडले आहेत. हे टॅब एक तर दुरुस्त करावे लागणार आहेत किंवा काढून टाकावे लागणार आहेत. या टॅबच्या दुरुस्तीसाठी कंत्राट देण्याचाही घाट शिक्षण विभागाने घातला होता. मात्र शिक्षण समितीत त्याला विरोध झाल्यानंतर टॅब दुरुस्ती आणि टॅब खरेदीही रखडली. विद्यार्थी मात्र हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहिले.

दरम्यान, दर वर्षी टॅबमध्ये अभ्यासक्रम घ्यावा (अपलोड करावा) लागतो. ती प्रक्रियादेखील या वर्षी पूर्ण झाली नसल्याची माहिती एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली. नगरसेविका सईदा खान याबाबत म्हणाल्या की, पालिकेने दिलेले टॅब हे अतिशय सुमार दर्जाचे होते. त्यापैकी किती चालू आहेत किती बिघडले आहेत याचा आढावा घेण्याची सूचना आम्ही टाळेबंदीपूर्वीच केली होती. हे टॅब इंटरनेटवर चालणारे नाहीत. त्यात केवळ अभ्यासक्रम होता. दुसऱ्या टप्प्यात चायनीज टॅब आणले होते त्याचा किती उपयोग झाला त्याची काहीच माहिती शिक्षण विभागाकडे नसल्याचा आरोपही सईदा खान यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना दिलेले टॅब सध्या शाळेतच असून, दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद असल्यामुळे या टॅबची आता दुरुस्ती करून ते नीट चालतात की नाही ते बघावे लागणार आहे. किती टॅब चांगल्या अवस्थेत आहेत याची माहिती मुख्याध्यापकांकडून मागवून चांगल्या अवस्थेतले टॅब मुलांना देण्यासाठी आम्ही लवकरच परवानगी घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

२९४४ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प

एखाद्या छोटय़ा महापालिकेच्या संपूर्ण अर्थसंकल्पाइतकी तरतूद मुंबई महापालिका शिक्षण विभागावर करीत असते. पालिकेच्या शाळेत दोन-अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. सन २०२०-२१ साठी पालिकेने २९४४.५९ कोटींची तरतूद केली होती. या वर्षी मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाइल नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील दुसऱ्या विद्यार्थ्यांकडील मोबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षणात सहभाग घ्यावा, अशी बालक मित्र योजना पालिकेने आखली आहे.