नागरी सेवा-सुविधांबाबत करण्यात आलेल्या देशपातळीवरील ११०० संस्थांच्या सर्वेक्षणामध्ये मुंबई महापालिकेने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या यादीमध्ये देशभरातील न्यायालये अग्रस्थानी असून दुसरा क्रमांक लष्कराने पटकावला आहे.ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरीने ‘द ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट, इंडिया स्टडी – २०१३’ची तिसरी आवृत्ती अलीकडेच प्रकाशित केली. यंदा भारतातील २११ वर्गवाऱ्यांमधील ११०० ब्रँडची यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवैज्ञानिक, संवादतज्ज्ञ आणि वागणूकतज्ज्ञ यांच्या सहकार्याने केलेल्या शेकडो तासांच्या संशोधनानंतर हा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल जागतिक पातळीवरही सखोल अभ्यास ठरला आहे. या अहवालाची एक प्रत महापौर सुनील प्रभू यांना शुक्रवारी सादर करण्यात आली. गेल्या १५ वर्षांमध्ये मुंबईकरांनी टाकलेल्या विश्वासामुळे शिवसेना-भाजप युतीला विकासाचे प्रकल्प राबविणे शक्य झाले. महापालिकेच्या यशामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे सुनील प्रभू यांनी सांगितले.