एकीकडे मर्यादित चाचणी, विलगीकरण क्षमता आणि दुसरीकडे वाढत जाणारा मृत्यूचा आकडा यावर मात करण्यासाठी आता करोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या आणि लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच करोना चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लक्षणे नसलेल्यांना अलग राहण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी नवी नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे.

मुंबईत सध्या खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये दर दिवशी सुमारे पाचशे चाचण्या केल्या जातात. त्यामुळे प्रयोगशाळांवरील ताण वाढत असून अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत दर दिवशी २०० हून अधिक रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. या रुग्णांना रुग्णालयातही दाखल केले जात आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णालयांमधील खाटांची संख्याही मर्यादित उरली आहे. परिणामी लक्षणे असलेल्या आणि अतिजोखमीच्या रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून पालिकेने चाचण्यांच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

एखाद्या भागात किंवा इमारतीमध्ये रुग्ण आढळल्यास त्या भागातील सर्वांची पूर्वतपासणी तिथल्या खास करोनाच्या दवाखान्यांमध्ये करण्यात येते. यात ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येतील. त्यांचीच चाचणी प्राधान्याने केली जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नव्या नियमावलीनुसार, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारून त्यांना अलग राहण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या इमारती किंवा घरांमध्ये स्वतंत्र खोली किंवा शौचालयाची सुविधा उपलब्ध असेल, तेथे या व्यक्तींना घरातच अलग राहण्यास सांगितले जाईल. या व्यक्तींना लक्षणे निर्माण झाल्यास घरीच नमुने घेतली जातील. परंतु झोपडपट्टी किंवा एकाच खोलीत राहणाऱ्या व्यक्तीना उपलब्ध असलेल्या अलगीकरण ठिकाणी दाखल केले जाईल.