नायर रुग्णालयातून पाच दिवसाच्या बाळाला पळवून नेल्याची घटना गुरुवारी घडली होती. बाळाची आई झोपलेली असताना वार्ड क्रमांक सात मधून एका महिलेने बाळ पळवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आले होते. यानंत याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान ते नवजात बालक सापडले असून बाळाला कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे.

पाच दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात दहिसर येथे राहणाऱ्या शीतल साळवी (३४) यांची सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली होती. त्यांना वार्ड क्रमांक सात मध्ये ठेवले होते. शीतल झोपल्या असताना त्यांच्या जवळच बाळ झोपवले होते. शीतल यांना जाग आल्यानंतर बाळ जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेचच त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कळविले. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला बाळाला घेऊन जाताना दिसली. त्यानंतर कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बाळाचे अपहरण केल्यानंतर संबंधित महिला व्ही. एन. देसाई रूग्णालयात अॅडमिट झाली. तसेच आपण घरी नवजात बाळाला जन्म दिल्याची माहिती तिने डॉक्टरांना दिली. परंतु तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना संशय आला. त्यानंतर डॉक्टरांनी वाकोला पोलिसांना याची माहिती दिली. वाकोला पोलिसांनी त्वरित कारवाई करत बाळाला ताब्यात घेत आग्रीपाडा पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान सदर महिलेने आपला गुन्हा कबुल केला. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या वडिलांना बोलावून ओळख पटवून बाळाला सुखरूप त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.