गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अतिवृष्टीचा मुंबईच्या लोकल वाहतुकीलाही फटका बसला आहे. यावरून राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यात आता मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी उडी घेतली आहे. मुंबईकरांनो कृपया स्वत:ला जपा, काळजी घ्या. मुंबई महापालिका अत्यंत असंवदेनशीलरित्या ही समस्या हाताळत असून त्यांना तुमची काळजी नाही, असा आरोप त्यांनी केला. शिवसेना करणार, भाजपा बघणार आणि मुंबई भरणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईत मेट्रोच्या कामामुळे पाणी तुंबत असल्याचा आरोप गेल्या आठवड्यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. तर भाजपाचे आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. मुंबईतील परिस्थितीस शिवसेनाच जबाबदार असल्याचे म्हटले होते. हाच धागा पकडत सचिन अहिर यांनी शिवसेना आणि भाजपा या दोघांवर निशाणा साधला. मुंबईकरांनी स्वत:च आपली काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

दरम्यान, मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात पुन्हा एकदा जोरदार पावसाने झाली. पहाटेपासून मुंबई आणि उपनगर परिसराला पावसाने झोपडून काढले. स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासात उत्तर आणि पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. मात्र ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. एवढेच नाही तर कोकणासह राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर कायम आहे. शनिवार आणि रविवार मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होताच. रविवार रात्रीपासून पावसाची बॅटिंग पुन्हा सुरू झाली आहे. नालासोपारा भागात पाणी साठल्याचीही माहिती समोर आली आहे. अँटॉप हिल, परळ, एलबीएस मार्गावरील शीतल सिनेमा या ठिकाणी पाणी साठले होते. तर पश्चिम उपनगरांपैकी गोरेगावातील सिद्धार्थ नगर, मिलन सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज या ठिकाणीही पाणी साठल्याचे बघायला मिळाले. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील नित्यानंद नगर, चेंबूर नाका, हिंदमाता फ्लायओव्हर, अमर महल जंक्शन, पवई या ठिकाणीही पाणी साठले होते.