05 June 2020

News Flash

संक्षिप्त : कनिष्ठ भ्रष्ट असेल तर वरिष्ठांवर कारवाई!

पोलीस ठाण्यातील एखादा कनिष्ठ अधिकारी भ्रष्ट असेल तर वरिष्ठ निरीक्षकावर बदलीची कारवाई करण्याचा माजी पोलीस आयुक्त ‘एम. एन. सिंग पॅटर्न’ मुंबईत पुन्हा राबविण्यात येणार आहे.

| August 13, 2014 02:33 am

पोलीस ठाण्यातील एखादा कनिष्ठ अधिकारी भ्रष्ट असेल तर वरिष्ठ निरीक्षकावर बदलीची कारवाई करण्याचा माजी पोलीस आयुक्त ‘एम. एन. सिंग पॅटर्न’ मुंबईत पुन्हा राबविण्यात येणार आहे. खार पोलीस ठाण्यातील लाच प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी आता हा पॅटर्न प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले आहे.
पोलीस ठाण्यातील अधिकारी लाच घेताना पकडला गेला तर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची बदली करण्याची पद्धत सुरुवातीला सिंग यांनी अमलात आणली. या पद्धतीचा पोलीस ठाण्याने इतका धसका घेतला की, लाच प्रकरणांमध्ये बऱ्यापैकी घट झाली. पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा मारीया यांनी याबाबतचे सुतोवाच केले होते. त्यानंतरही पोलीस ठाण्यातील शिपाई वा अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले गेले. परंतु तरीही वरिष्ठ निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली नव्हती.

कोकण रेल्वेमार्गावर वातानुकुलित शताब्दी एक्सप्रेस
मुंबई : यंदा स्वातंत्र्यदिन शुक्रवारी आणि गोकुळाष्टमी सोमवारी आल्यामुळे प्रदीर्घ साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे यंदा १५ ऑगस्ट रोजी कोकणात जाण्यासाठी एक विशेष वातानुकुलित शताब्दी गाडी सोडणार आहे. या गाडीचे आरक्षण आज, बुधवारी सुरू होणार आहे. ०२००१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-करमाळी ही गाडी शुक्रवारी सकाळी पाच वाजता मुंबईहून रवाना होईल. ही गाडी याच दिवशी संध्याकाळी ४.३० वाजता करमाळीला पोहोचेल. ०२००२ करमाळी-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही विशेष शताब्दी गाडी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता करमाळीहून निघून त्याच दिवशी संध्याकाळी ५.५० वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीत एक एक्झिक्युटिव्ह वातानुकुलित खुर्चीयान, सहा वातानुकुलित खुर्चीयान असे डबे असतील. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि थिविम येथे थांबेल.

लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक
मुंबई : अल्पवयीन मुलींना गाठून आणि त्यांना पोलीस असल्याचे सांगून लंगिक अत्याचार करणाऱ्या सुधीर सोनावणे (२२) या तरुणाला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. चेंबूर, टिळकनगर येथील एका मुलीच्या घरात घुसून आणि तिला पोलीस दलात भरती करतो असे सांगून तिच्यावरही याच तरुणाने लैंगिक अत्याचार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तरुणाने अनेक मुलींवर अतिप्रसंग केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक केवळे यांनी सांगितले.  

लोकलमध्ये प्रवाशास मारहाण करणारा पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : उपनगरी गाडीत प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणातून अन्य प्रवाशाला मारहाण करणाऱ्या मारकुटय़ा प्रवाशाला  बोरिवली रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयवंत पाटील (५७) असे या व्यक्तिचे नाव आहे.  हा प्रकार ४ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकातून डहाणूला जाणाऱ्या लोकलमध्ये दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घडला होता. पाटील याने अन्य एका प्रवाशाला मारहाण केली होती. या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मिडिया तसेच वृत्तवाहिनीवरून प्रसारित झाली होती. या व्हिडिओ क्लिपच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पारसकरांची अटक टळली
मुंबई : मॉडेलने बलात्काराचा आरोप केलेले आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांच्या कोठडी चौकशीची गरज नसल्याचे सांगत सत्र न्यायालयाने मंगळवारी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. बलात्काराप्रकरणी मॉडेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पारसकर यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या आठवडय़ापासून त्यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालय पोलीस, पारसकर आणि मॉडेलच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकत होते. पारसकर यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करीत अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2014 2:33 am

Web Title: mumbai news in short 10
टॅग Mumbai News
Next Stories
1 दहीहंडी संदर्भातील अटींविरोधात जितेंद्र आव्हाड सर्वोच्च न्यायालयात
2 मुंबई पोलिसांसाठी हायटेक मोटारसायकल
3 या निर्णयाचे स्वागतच!
Just Now!
X