ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली बनावट उत्पादने विकून गंडा घालणाऱ्या तिघांना शिवडी पोलिसांनी अटक केली. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणांचा समावेश असून मौजमजेसाठी ते हे कृत्य करत होते. किशन जैस्वाल (१९), दीपक सरोज (२०) आणि आझिम शेख (२४) अशी या तिघांची नावे आहेत. किशन आणि दीपक महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.  आझिम या त्यांच्या मित्राचे मोबाईलचे दुकान आहे. तो बनावट चिनी कंपनीचे आयफोन दिसणारे मोबाईल आणायचा. किशन आणि दीपक खरे आयफोन आहेत, असे सांगून या ऑनलाइन साइटवर विक्रीसाठी ठेवत असत. त्याची किंमत २० ते २२ हजार रुपये सांगत असत. अशा पद्धतीने त्यांनी भांडुप येथील एका तरुणाला गंडा घातला होता.

बारमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
ठाणे  : वारंवार कारवाई करूनही ठाण्यातील बारमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांना लगाम बसत नाही हे लक्षात येताच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या बारमधील बेकायदा बांधकामांवर हातोडा फिरविण्याची मोहीम मंगळवारपासून सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ‘लेडीज बार’ सुरू ठेवताना तेथे बारबालांना लपविण्यासाठी बारमालकांनी विशिष्ट पद्धतीच्या खोल्या तयार केल्या आहेत. या खोल्यांची बांधकामे बेकायदा असल्याचा अहवाल पोलिसांनी ठाणे महापालिकेस दिला होता. अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत बांधकाम केलेल्या ५५ बारची यादी तयार केली असून त्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे. बारमधील या खोल्या उभारताना कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. या बारवर कारवाई केल्यानंतरही ते काही दिवसात सुरू होतात. त्यामुळे बारचालकांच्या कार्यपद्धतीला आळा घालण्यासाठी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी आयुक्त असीम गुप्ता यांना एक पत्र पाठवून बेकायदा बांधकामे झालेल्या बारची भलीमोठी यादी महापालिकेकडे सादर केली. कापूरबावडी-माजिवडा येथील माया बार आणि मानपाडा येथील झरना बारवर कारवाई करण्यात आली.
महापे रस्त्यावर सिलिंडरच्या स्फोटात एक ठार, तिघे जखमी
ठाणे : शिळ-महापे रस्त्यावर मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडरच्या स्फोटात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मजुरांसह एक पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. लोखंड जोडणीच्या (वेल्डिंग) कामासाठी भर रस्त्यातून मजूर पायाने ढकलत हा सिलिंडर घेऊन जात होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा स्फोट झाला.गुलाब ऊर्फ समेश आलम इबेन अल शेख (२०) असे मृत मजुराचे नाव आहे, तर शहनाज अब्दुल करिम शेख (२५), अब्दुल महमद आमिन चौधरी (५५) या दोन मजुरांसह श्रीराणा जाधव (४२) हा पादचारी गंभीर जखमी झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या परिसरात फेब्रिकेशनचे वर्कशॉप असून तेथील लोखंड जोडणीच्या कामासाठी तिघे मजूर पुरवठादाराकडून गॅसने भरलेला सिलेंडर ढकलत घेऊन चालले होते. त्यावेळी दुभाजकाचा एक भाग सिलेंडरच्या वॉलला लागल्याने सिलेंडरचा स्फोट झाला.
महिलेकडून पाच लाखांचा गंडा
मुंबई:मूल होण्यासाठी पूजा करण्याच्या नावाखाली एका महिलेला ५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका महिलेस लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. नागपाडय़ात राहणाऱ्या शबाना खान (नाव बदललले) मूल होत नसल्याने त्रस्त होती. त्यावेळी तिची भेट परवीन मन्सुरी (३५) या महिलेशी झाली. मूल होण्यासाठी तिने शबानाला काही धार्मिक विधी करणार असल्याचे सांगितले. या ताविजच्या मोबदल्यात तिने शबानाकडून ३० हजार रुपये घेतले. तीन महिन्यांत शबाना गर्भवती राहील, असा दावा केला होता. नंतर अजमेर येथे काही धार्मिक विधी करायला लागतील, असे सांगितले. या मोबदल्यात तिने तिच्याकडून साडेचार लाख रुपये उकळले.
अकरावीच्या ७४ हजार जागा रिक्त
मुंबई:मुंबई महानगर क्षेत्रासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ७४,१०९ जागा रिक्त राहिल्या आहेत तर २१४ विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत.  गुणवत्ता यादीत एकूण २७,९४५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.   जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत त्यांनी भरलेल्या ३५ महाविद्यालयांच्या पर्यायांपैकी एकाही महाविद्यालयात त्यांच्या गुणांना प्रवेश मिळणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांमध्ये १७ जुलैपर्यंत शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे.
पोलीस पाटलांना लवकरच मानधनवाढ
मुंबई: राज्यातील कायदा व सुवस्था राखण्यासाठी गावपातळीवरील पोलीस यंत्रणेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहे.  राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच गृहमंत्री आर.आर.पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली.