मुंबईत चोऱ्या आणि घरफोडय़ा करणाऱ्या दोन कुख्यात टोळ्यांमधील गुंडांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई आणि परिसरात घरफोडय़ा घालणाऱ्या दोन स्वतंत्र टोळ्या एकाच वेळी ओशिवरा पोलिसांच्या हाती आल्या आहेत. पहिली टोळी रात्रीच्या वेळी घरफोडय़ा करणारी होती. योगेश जैस्वाल (२९) आणि विनोद देवकर (२७) या दोन गुंडांवर मुंबई आणि परिसरात नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले. दुपारच्या वेळी कार्यालयात शिरून चोरी करण्यात त्यांचा हातखंडा होता.
या दोघांनी बॉम्बे रुग्णालय तसेच म्हाडाच्या वांद्रे येथील कार्यालयातून लॅपटॉप चोरला होता. तर अंबरनाथ येथील एका पतपेढीवरही दरोडा घातला होता. दुसऱ्या टोळीतील अली मन्सुरी (२५) आणि सुनिल शुक्ला (२८) या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाखांचे चोरलेले सोने जप्त करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष वेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुखेडकर यांनी ही कारवाई केली.

नामांकित डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगल्याने तरुणाची आत्महत्या
मुंबई : जगप्रसिद्ध डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकत नसल्याचे लक्षात आल्याने नैराश्यातून एका तरुण डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली.
संदीप बळवंत पाटील (२९) हा तरुण डॉक्टर कांदिवलीच्या ठाकूरद्वार येथील पार्वतीबाई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कार्यरत होता. याशिवाय तो बोरिवलीच्या एका रुग्णालयातही अर्धवेळ डॉक्टर म्हणून काम करत असे. शुक्रवारी रात्री चव्हाण याने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर पंख्याला गळफास लावून घेतला. परंतु तेथील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी त्वरीत संदीपला खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी आणले. दोरखंडाचा मानेला झटका लागल्याने त्याच्या मानेचा मणका मोडला होता. उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. संदीपने लिहिल्या चिठ्ठीत, ‘मी खूप मेहनत करून डॉक्टर झालो. पण मला मुंबईतल्या मोठय़ा रुग्णालयात काम करायचे होते. मला जगप्रसिद्ध डॉक्टर बनायचे होते. परंतु मी त्यात अपयशी ठरल्याने आत्महत्या करत आहे’, असे असे लिहिले आहे.

फी सवलतीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना एकदाच उत्पन्नाचा दाखल देण्याची मुभा
मुंबई : राज्यातील खासगी विनाअनुदानित वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय (ओबीसी), तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क सवलतीसाठी फक्त एकदाच सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला देण्याची मुभा राहणार आहे. त्यावर त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ही सवलत मिळणार आहे, असे सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
राज्यातील खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, भटके-विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत दिली जाते. मात्र या सवलतीसाठी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ५० हजार रुपयांच्या आत असले पाहिजे, अशी अट आहे. या सवलतीसाठी आतापर्यंत मागास विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत होता़

मुरूड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना साहाय्य
मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी दोन लाख
मुंबई : मुरूड येथे समुद्रात बडून मरण पावलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
६ जुलै रोजी चेंबूर येथील काहीजण मुरूड येथे सहलीला गेले होते. त्यावेळी रोहित झाला, विनोद अनई, दिनेश पवार, संजय पांचाळ, दिलीप गोळे, आणि शंकर चव्हाण हे सहाजण समुद्रात बुडून मरण पावले होते. त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची मागणी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ही मदत देण्यात येणार आहे.

लाचखोर महिला पोलीस अटकेत
मुंबई : मालवणी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शमा सैय्यद यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने ४ हजारांची लाच घेताना अटक केली. एका चहाच्या टपरीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
या टपरीवर काम करणाऱ्या एका मुलाविरोधात मारामारीचा गुन्हा दाखल होता. सय्यद यांच्याकडे या प्रकरणाचा तपास होता. या आरोपी मुलास हजर न केल्यास चहाची टपरी बंद करण्यात येईल, अशी धमकी सय्यद यांनी फिर्यादीस दिली होती. आणि पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.

आषाढीनिमित्त मुंबईचे डबेवाले दोन दिवस सुटीवर
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुंबईचे डबेवाले पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला निघाले आहेत. त्यामुळे ९ आणि १० जुलै रोजी त्यांनी सुटी घेतली आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या दिंडय़ा पंढरपूरमध्ये रवाना झाल्या आहेत. वारक ऱ्यांप्रमाणेच मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे ते पंढरपूरला निघाले आहेत. डबेवाले सुटीवर गेल्यामुळे ९ आणि १० जुलै रोजी डबे पोहोचविण्याची सेवा बंद राहणार आहे.