भिवंडी येथील निंबवली फाटय़ाजवळ पेट्रोल पंप व्यवस्थापकच्या गाडीवर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतेच गजाआड केले आहे. इम्रान मुबारक खान(२४), वसीम अखील शेख(२८), फैय्याज अहमद उर्फ बबलू लियाकत शेख(३०), जुबेर अहमद उर्फ लादेन सोहेब शेख(२८), विजय उर्फ विकी सुदाम कर्णेकर(२८), रणजीत भास्कर कशिवले(२४) व मनमोहन सुर्यप्रताप सिंग(२७) अशी त्यांची नावे आहेत़

पावसामुळे ‘मरे’ पुन्हा कोलमडली
मुंबई : अधेमध्ये रिमझिमणाऱ्या पावसापुढेही यंदा मध्य रेल्वेने पूर्णपणे मान टाकल्याचे दिसत आहे. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पहिल्या पावसाने कुल्र्याजवळ मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजवल्यानंतर सोमवारी पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवर तीच आफत ओढावली. दुपारनंतर मुंबईत पावसाची संततधार सुरू झाली. त्यामुळे पुन्हा कुर्ला परिसरात रेल्वेरुळांवर पाणी तुंबले. परिणामी संध्याकाळी साडेचारनंतर गर्दीच्या वेळी कुल्र्याजवळील सिग्नल यंत्रणा कोलमडली. त्यामुळे या ठिकाणचे सिग्नल ए-मार्कर यंत्रणेवर चालवण्यात येत होते. यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. अर्थातच गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.