गावोगावी पसरलेल्या विद्युत यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती आणि विस्ताराच्या कामात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या विद्युत सहाय्यकपदासाठी ‘महावितरण’ने पुन्हा एकदा महाभरती सुरू केली आहे. यंदा राज्यभरात ६५४२ जागा भरण्यात येणार असून दहावीतील गुणांच्या आधारे ऑनलाइन निवड प्रक्रिया होणार आहे.या भरतीबाबत तपशीलवार माहिती ‘महावितरण’च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण आणि आयटीआयचे वीजतंत्री-तारतंत्री यासारखे अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात.  भरतीसाठीची अर्जप्रक्रिया ऑनलाइन होणार असून अर्ज दाखल करण्याची मुदत ३० सप्टेंबर आहे.प्रारंभी निवड झालेल्या उमेदवारांना तीन वर्षांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून घेतले जाईल. त्यांना पहिल्या वर्षी दरमहा ७५०० रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा ८५०० रुपये आणि तिसऱ्या वर्षी दरमहा ९५०० रुपये असे विद्यावेतन मिळेल.

चित्रपट निर्मात्याच्या घरावर गोळीबार
मुंबई : बॉलिवूडचे चित्रपट निर्माते अली मोरानी यांच्या जुहू येथील बंगल्यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. शनिवार रात्री ही घटना घडली. या गोळीबारात कुणी जखमी झाले नाही. कुख्यात गुंड रवी पुजारी टोळीने हा गोळीबार केल्याचा संशय आहे. अली मोरानी हे बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते आहेत. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या जुहू येथील शगुन बंगल्यावर गोळीबार केला आणि पळून गेले. मोरानी त्यावेळी नुकतेच घरी परतले होते. हल्लेखोरांनी एकूण पाच राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात कुणी जखमी झालेले नाही.

मुंब्रा, कौसा परिसरातील भारनियमनाच्या वेळेत बदल
ठाणे : महावितरण कंपनीच्या ठाणे- ३ विभागांतर्गत येणाऱ्या मुंब्रा, कौसा या परिसरातील सागर फिडर (मुंब्रा-१) या वीज वाहिनीवरील देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
मंगळवार २६ व बुधवारी २७ ऑगस्ट असे दोन दिवस चालणाऱ्या या कामामुळे मुंब्रा व कौसा या दोन्ही भागातील भारनियमनाच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. या भागात येणाऱ्या सागर हॉटेल एरिया, रशीद कंपाऊंड, देवरीपाडा, बरकत पार्क, अजीज कंपाऊंड, वफा पार्क, सैनिक नगर, अलमास कॉलनी या परिसरात दुपारी १२ ते तीन वाजेपर्यंत भारनियमन केले जाणार आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.