विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी आमदार बच्चू कडू यांनी सुमारे ४०० कार्यकर्त्यांसोबत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या मलबार हिल येथील ‘मुक्तागिरी’ या निवासस्थानी अनपेक्षितरित्या घुसून ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन तब्बल ३० तासांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
वर्षभरापूर्वी प्रहार संघटनेने अपंगांच्या २१ मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी यातील अंतिम आठ मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यात आले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी संध्याकाळी आमदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या़  अपंग आणि सुदृढ यांचा विवाह झाला तर निधी देणे, अपंगांना उद्योगासाठी जागा देण्याचे निकष शिथील करणे, अपंगांना मिळणाऱ्या घरकुलासाठी दारिद्रय़ रेषेची अट रद्द करणे, अपंगांसाठी विविध योजनांच्या अटीही शिथील करणे, या मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती प्रहार संघटनेचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. मनोज टेकाडे यांनी दिली.

विविध मागण्यांसाठी विद्यापीठात राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे आंदोलन
मुंबई :  विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठात गेले काही दिवस विविध संघटनांमार्फत आंदोलन सुरू आहे. मंगळवारी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही विद्यापीठाच्या कालिना संकुलात आंदोलन केले.  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कालिना परिसरात प्रत्येक इमारतीसमोर कुलगुरुंच्या नावाने हाकारे देत आंदोलन सुरू केले. कुलगुरू भेट देईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. अखेर कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी प्रवेशद्वाराजवळ येऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि येत्या दोन दिवसांत सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.  दरम्यान, ‘मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय शिक्षक संघटने’नेही (बुक्टु) १३ फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विद्यापीठात यूपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू
मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई विद्यापीठात केंद्र सुरू करण्यात आले असून यंदा या केंद्राद्वारे ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेिनग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका डॉ. संगीता पवार या केंद्राच्या समन्वयक म्हणून काम पाहतील. यासाठी विद्यार्थ्यांची सीईटी घेण्यात आली होती. एकूण १३०२ विद्यार्थ्यांनी ही सीईटी दिली. त्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना चार हजार रूपये शैक्षणिक भत्ता देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, वाचनालय, इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या कालिना संकुलात दोन वर्ग तर रत्नागिरी उपकेंद्रात एक वर्ग सुरू होणार आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे निर्देश ; उत्पन्नाची शहानिशा न करता शिधापत्रिका द्या
मुंबई : नवीन शिधापत्रिका देताना अर्जदार नमूद करेल, ते उत्पन्न शहानिशा न करता खरे मानून त्यानुसार शिधापत्रिका जारी करण्याचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यामुळे ‘अन्न सुरक्षा’ योजनेचा लाभ घेणे आणि त्यासाठी नव्या शिधापत्रिका मिळविणे, सोयीचे होणार आहे.
दारिद्य रेषेखालील व्यक्ती, निराधार व अंत्योदय योजनेचे लाभार्थी आदींसाठी शिधापत्रिका मिळविताना अडचणी येतात. तहसीलदारांकडून मिळणारे उत्पन्नाचे दाखले सादर करण्याचीही अट न ठेवता उमेदवाराने स्वत: प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेले प्रमाणपत्रही ग्राह्य़ मानण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र तक्रारी आल्यास उत्पन्नाची चौकशी करावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

कूपर रुग्णालयात काम बंद
परिचारिकेचा अपमान झाल्याचा आरोप
 मुंबई : वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिकेचा अपमान केल्याने महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून ‘काम बंद’ आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितल्यानंतर दुपारी दीड वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात महापौर सुनील प्रभु यांनी सोमवारी आकस्मिक भेट देऊन सोयीसुविधांची पाहणी केली. त्या वेळी रुग्णालयातील अस्वच्छतेविषयीही त्यांनी नापसंती व्यक्त केली. रुग्णालयातील एका वॉर्डमधील अस्वच्छतेसाठी प्रमुख वैद्यकीय अधिक्षका डॉ. सीमा मलिक यांनी परिचारिकेला जबाबदार धरले व तिला सर्वासमोर खेचत नेले, असा आरोप कर्मचारी मजदूर युनियनचे साहाय्यक सरचिटणीस अशोक जाधव यांनी केला. डॉ. मलिक यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

लाचखोर बोराडेला न्यायालयीन कोठडी
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेतील लाचखोर साहाय्यक आयुक्त गणेश बोराडे व त्याचा साथीदार चालक कय्यूम शेख यांना पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी कल्याण जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डोंगरे यांनी आज फेटाळल्याने दोन्ही आरोपींची आधारवाडी तुरुंगात रवानगी करण्यात आली. बोराडेची दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्याला कल्याण न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हजर केले होते. यावेळी ‘एसीबी’च्या वतीने सरकारी वकील दीपक तरे यांनी बोराडे व शेख यांना अधिक चौकशीसाठी वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयापुढे केली. न्यायालयाने ती फेटाळून लावली. चौकशी अधिकारी नितीन काकडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय घेण्यात येत आहे. बोराडे याच्या सुटकेसाठी बाहेर एक मोठी ‘फळी’ कार्यरत झाली असल्याची जोरदार चर्चा पालिकेत, शहरात सुरू आहे.

सरकारी नोकरीतील मराठा टक्का फुगविण्याचा घाट
मुंबई : निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भातील राणे समितीचा अहवाल अंतिम टप्यात आलेला असतानाच सरकारी नोकऱ्यांमधील मराठा टक्का जाणूनबुजून फुगवून या समितीची दिशाभूल केली जात असल्याने या सर्वेक्षण मोहिमेपासून अन्य मागास (ओबीसी) प्रवर्गातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना दूर ठेवण्याची मागणी आ. विनायक मेटे यांनी केली आहे. सर्वेक्षणातून मराठा समाज मागास आसल्याचे आढळल्यास आरक्षणाची मर्यादा ५२ टक्केच्या पुढे ओलांडता येईल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालायाने एका प्रकरणात दिला आहे. त्याआधारे मराठा आरक्षणाचा निर्णयही टिकावा याची खबरदारी समितीकडून घेतली जात आहे. त्यानुसार राणे समितीने प्रशासनातील विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आदींना माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. सर्व विभागांनी ती सादर केली असून काहींनी तर अन्य प्रवर्गातील कर्मचारीही मराठा समाजात दाखवून टक्का फुगवून सांगितला आहे.