होळीच्या दरम्यान लोकलवर होणारे फुग्यांचे हल्ले यंदाही सुरू झाले आहेत. भाईंदर-मीरारोड स्थानकांदरम्यान गुरुवारी सकाळी धावत्या लोकलवर फेकलेली पाण्याची पिशवी एका महिलेच्या चेहऱ्यावर आदळली. त्यात ती जखमी झाली आहे. भाईंदरमध्ये राहणाऱ्या वैशाली दमानिया (३३) या यांनी गुरुवारी सकाळी ९.३५ची दादर लोकल पकडली. गाडी काही अंतरावर जाताच केबीन नाका येथील शांतीनगर परिसरातून पाण्याने भरलेली पिशवी लोकलवर फेकण्यात आली. दारात उभ्या असलेल्या वैशाली यांच्या चेहऱ्यावर ती आदळली. या अचानक ‘हल्ल्या’मुळे सहप्रवाशांनी मीरा रोड स्थानकाजवळ साखळी खेचली. स्टेशन अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी वैशाली यांना तातडीने मीरारोड येथील उमराव रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पापणीच्या कडा फाटल्या असून बुबुळात रक्त साकळले आहे. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने डोळा बचावल्याचे वसई रेल्वे पोलीस निरीक्षक पांडुरंग भांगरे यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयातून वृद्ध महिला रुग्ण बेपत्ता
मुंबई : धुळे जिल्ह्य़ातून के.ई.एम. रुग्णालयात दाखल झालेल्या नीराबाई पाटील (वय ६५) या गुरुवारी दुपारी रुग्णालयातून बेपत्ता झाल्या आहेत. नीराबाई यांच्या मेंदूत गाठ होती. त्यांच्यावर सोमवारी शस्त्रक्रिया झाली होती आणि गुरुवारी त्यांना घरी पाठविण्यात येणार होते. त्यांचा मुलगा त्याबाबतची लेखी प्रक्रिया पूर्ण करीत असताना त्या ३१ क्रमांकाच्या वॉर्डबाहेर बसून होत्या. तो तेथे परतला तेव्हा त्या आढळल्या नाहीत. रुग्णालयात सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्या हरविल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली, असे त्यांचा नातू एकनाथ पाटील याने सांगितले. त्यांना मराठी किंवा हिंदी येत नसल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत.

मुंब्य्रात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन
ठाणे : लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री ठाणे पोलिसांनी अचानकपणे मुंब्रा परिसरातील रशिद कंपाऊंडमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये सुमारे ५० ते ६० संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीअंती सोडून दिले आहे.
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना करण्यासंबंधी पोलिसांकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. मुंब्रा परिसरात दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याचे यापूर्वीच पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. असे असतानाच बुधवारी मध्यरात्री ठाणे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या पथकाने मुंब्य्रातील रशीद कंपाऊंड परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केले. मात्र त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.

बेस्टच्या दोन बसची टक्कर, १० जखमी
मुंबई : बेस्टच्या एका बसला दुसऱ्या बसने मागून धडक दिल्याने या अपघातात १० प्रवासी जखमी झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंडजवळ हा अपघात घडला. या रस्त्यावर अंधार असल्याने रस्त्याचा अंदाज घेण्यासाठी एका बसच्या चालकाने बाहेर डोके काढले. त्याचवेळी बाजूच्या झाडाची फांदी चालकाला लागली. त्यामुळे त्याने तात्काळ ब्रेक दाबले. याच दरम्यान मागून येणाऱ्या बेस्टच्याच दुसऱ्या बसची या बसला धडक बसली. नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे.