नववीच्या परीक्षेत सलग दुसऱ्या वर्षी नापास झाल्याने नैराश्य येऊन एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना मुलुंड येथील सालपादेवी पाडा येथे घडली. गिरीश सरदारा असे त्याचे नाव असून तो एसएमपीएस इंग्रजी शाळेत शिकत होता. सोमवारी दुपारी दोन वाजता निकाल लागल्यानंतर तो दुसऱ्यांदा अनुत्तीर्ण झाल्याचे त्याला समजले. घरी पोटमाळ्यावर गेला असताना तो बराच वेळ खाली न आल्याने त्याची आई पोटमाळ्यावर गेली़ दरवाजा बंद असल्याने तिने खिडकीतून डोकावले असता ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत गिरीश तिला दिसला.

ठाण्यात महिलेची हत्या
ठाणे : येथील बाळकुम परिसरातील घरामध्ये सोमवारी सकाळी एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असून, तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. बाळकुम येथील मोतीराम स्मृती इमारतीत तळमजल्यावर सुनीता पाटील (४०) एकटय़ाच राहत होत्या. त्यांचा ११ वर्षीय मुलगा आजोळी राहतो. याच इमारतीत सुनीता यांचे दीर अनंत पाटील राहतात. सोमवारी सकाळी सुनीताच्या खोलीतून दरुगधी येत होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहाणी केली असता, त्यांना घरामध्ये सुनीताचा मृतदेह आढळला.

टँकरच्या धडकेत सायकलस्वार ठार
मुंबई : नियंत्रण सुटलेल्या टँकरने धडक दिल्याने १५ वर्षांचा सायकलस्वार मुलगा ठार झाला तर अन्य पाच जण जखमी झाले. सोमवारी सकाळी गोरेगाव येथे हा अपघात घडला. पोलिसांनी टँकर चालकास अटक केली आहे. गोरेगावच्या स्वामी विवेकानंद मार्गावरून एक टँकर मालाडहून अंधेरीच्या दिशेने जात होता. सिटी सेंटर मॉलजवळील गुंदेचा जंक्शन येथे या टँकरचे नियंत्रण सुटले. टँकर चालक भूषण जैस्वाल याने एका मोटारगाडीला तसेच सायकलस्वाराला धडक दिली. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या चार पादचाऱ्यांनाही ठोकरले. या धडकेत सायकलवरील ओंकार शेलार (१५) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील मयुरेश (४५) जखमी झाले आहेत़  किरकोळ जखमी झालेल्या अन्य चार जखमी पादचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी टँकर चालक भूषण जैस्वाल याला अटक केली.

अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शहापूर : शहापूर उपजिल्हा रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची सोमवारी प्रसूती झाली़ गेल्या दोन वर्षांपासून काका तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. डोळखांबजवळील गुंडे गावात पीडित मुलगी आणि काका राहतो. दोन वर्षांपासून तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. यातूनच ती गरोदर राहिली होती. या प्रकरणी न्यायालयाने काकाला कोठडी सुनावल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सांगितल़े

दाभोलकर खूनप्रकरणी ठोस पुरावा नाही
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील आरोपींवर वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे बजावण्यात आलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटीसला पोलिसांकडून प्रतिज्ञापत्राद्वारे सोमवारी उत्तर देण्यात आले. या गुन्ह्य़ातील आरोपींचा गुन्ह्य़ात सहभाग असला, तरी आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावा नसल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याप्रकरणी अटक केलेले मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्यावर वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोघांना जामीन मंजूर केला होता.