एका मॉडेलला भररस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मूनाझ नावाच्या मॉडेलला रिक्षाचालकाने सोमवारी अश्लिल शिवीगाळ करत तिच्या मोटारीचे नुकसान केले होते.मॉडेल आणि अभिनेत्री मूनाझ मेवावावाल ही गोरेगाव येथे राहते. सोमवारी दुपारी ती आपल्या गाडीने चित्रिकरणासाठी निघाली होती, त्यावेळी हैदर अली अब्बासअली नावाच्या एका रिक्षाचालकाने तिच्याकडे पाहून अश्लिल शेरेबाजी केली. त्याला तिने आक्षेप घेत विरोध केला आणि पुढे निघाली. मात्र रिक्षाचालकाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. रत्नानाका येथील सिग्नलवर तिची गाडी थांबली असता हैदरअली तिथे आला आणि त्याने तिला शिविगाळ केली. मूनाझने या प्रसंगाचे मोबाइलमध्ये चित्रण केले आणि पोलिसांना ही चित्रफित दाखवली.

‘मुलांच्या काळजीसाठी सुट्टी मागणे हा गुन्हा आहे का?’
मुंबई :मुलांच्या काळजीसाठी प्रत्येक महिलेला सुट्टी देण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून हाताळण्याऐवजी त्याबाबत असंवेदनशील असलेल्या विमानतळ प्राधिकरणाला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. एखाद्या महिलेने मुलांच्या काळजीसाठी सुट्टी मागणे हा गुन्हा आहे का? असा सवाल करीत सुट्टी मागण्यामागील कारण कारण काय आहे, त्याकडे पाहण्यासही न्यायालयाने सांगितले.  विमानतळ प्राधिकरणाच्या हवाई सुरक्षा विभागात उप व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या एस. मंगला यांच्या १२ वर्षांच्या मुलीला ऐकू न येण्याची अडचण आहे. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारने सप्टेंबर २००८ सालच्या सहाव्या वेतन आयोगाद्वारे मुलांच्या काळजीसाठी केलेल्या शिफारशीचा दाखला देत दोन वर्षांची सुट्टी देण्याची विनंती प्राधिकरण प्रशासनाकडे केली होती. त्यांची ती मागणी फेटाळून लावण्यात आल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

उल्हास नदीत बुडून  दोन भावंडांचा मृत्यू
ठाणे :बदलापूर परिसरातील बॅरेज परिसरात उल्हास नदीत पोहायला आलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.
अजय बाळू निकाळजे (१६) आणि शंकर दशरथ खंडागळे (१६) हे दोघेही उल्हासनगर येथील मामेभाऊ आणखी एका मित्रासोबत सोमवारी उल्हास नदीत पोहायला आले होते. त्यांच्यासोबत आलेला मित्र मात्र पाण्यात न उतरता काठावर बसून होता. बराच वेळ मित्र पाण्याबाहेर न आल्याने तो घाबरलेल्या अवस्थेत घरी परतला. सोमवारी संध्याकाळपर्यंत त्याने कुणालाच या घटनेविषयी सांगितले नव्हते. रात्री उशिरा त्या दोघांची घरच्यांकडून शोधाशोध सुरू झाल्यावर त्याने सकाळचा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बदलापूरकडे धाव घेतली. पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रीच शोध सुरू केला. मात्र मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास बदलापूर गावातील पुलाखाली अजयचा मृतदेह आढळला तर दुपारी साडेबारा वाजता शंकरचा मृतदेह मिळाला.

पोलीस कोठडीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू
मुंबई : हत्येच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या इमा खान  या आरोपीचा बोरीवली कारागृहातील संशयास्पद मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. एका व्यावसायिकाच्या हत्येच्या गुन्ह्यात इमाला अटक केली होती. १९ एप्रिलपासून तो कोठडीत होता. मंगळवारी सकाळी तो तुरूंगाच्या बाथरूमच्या बाहेर अचानक कोसळला. त्याला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस उपायुक्त प्रविण पाटील यांनी सांगितले.