अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिची आई राबिया खान हिने केला असून तिचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर या प्रकरणी आत्महत्येचा की खुनाचा गुन्हा दाखल करायचा वा प्रकरण अन्य अधिकाऱ्याकडे वर्ग करायचे याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी जिया आणि तिचा मित्र सूरज पंचोली यांच्यात ब्लॅकबेरीवरून झालेल्या संदेशांची, लॅपटॉप, आयपॅडमधील माहिती तसेच तिच्या शवविच्छेदनाची चित्रफीत तिच्या आईला उपलब्ध करायची की नाही याचाही निर्णय आयुक्तांनीच घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  जियाने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आणि या प्रकरणी पोलीस सूरज पंचोलीला वाचवीत असल्याचा आरोप करीत राबिया यांनी प्रकरणाची ‘सीबीआय’ वा ‘एसआयटी’ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रवी पुजारी टोळीच्या दोन गुंडांना अटक
मुंबई : कुख्यात रवी पुजारी टोळीच्या दोन गुंडाना मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून एक कार्बाईन गन, पिस्तुल एक मॅगझिन आणि त्याचे पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये बाउन्सरचे काम करत होते.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. खंडणीविरोधी पथकाला कांदिवलीच्या समता नगर येथे रवी पुजारी टोळीच्या दोन गुंड शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून दीपक पडवळ (२७) आणि अमोल सावंत (२९) यांना अटक केली.
पुजारी टोळीच्या आपल्या सहकाऱ्याला देण्यासाठी त्यांनी ही शस्त्रे आणल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी सांगितले. ही शस्त्रे आणि निवडणुका यांचा काहीही संबध नसल्याचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटी प्रकरणाचा अहवाल आज सादर
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम.च्या एमएचआरएम या विषयाच्या पेपरफुटीप्रकरणी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. मधू नायर समितीचा अहवाल सोमवारी पूर्ण झाला असून हा अहवाल मंगळवारी सादर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नायर यांनी सोमवारी दिली. मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम.च्या सहाव्या सत्राचा एमएचआरएमचा पेपर कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयामध्ये फुटला होता. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे द्विसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने या महाविद्यालयाला भेट देऊन परीक्षा केंद्रावरील सोयीसुविधा, तंत्र प्रयोगशाळा, ई-वितरण पद्धती, तंत्रज्ञान विभागातील कर्मचारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आदींची चौकशी केली. या समितीने अहवालात चार सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

कोकण रेल्वेमार्गावर दोन उन्हाळी विशेष गाडय़ा
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर उन्हाळी हंगामात असलेली जादा गर्दी मार्गी लावण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने या मार्गावर दोन विशेष गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या या दोन गाडय़ा कोच्चुवेल्ली आणि एर्नाकुलम या ठिकाणी जातील. एर्नाकुलमसाठी जाणारी गाडी दर मंगळवारी निघेल, तर कोच्चुवेल्लीसाठीची गाडी दर शुक्रवारी रवाना होईल. या दोन्ही गाडय़ा उन्हाळी हंगामापुरत्या धावणार आहेत.