भरधाव वेगात जाणाऱ्या एका डंपरने धडक दिल्यामुळे स्कुटीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथे घडली. संतोष विश्वकर्मा (५२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
संतोषकुमार हे रात्री ८ च्या सुमारास त्यांचे नातेवाईक रामनाथ विश्वकर्मा यांच्याशी बोलत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने संतोषकुमार यांच्या स्कुटीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोषकुमार यांना कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातादरम्यान नियंत्रण गमावलेल्या डंपरने आणखी एका मोटारसायकलला धडक दिल्यामुळे प्रकाश पितळे (२८) हा तरुण जखमी झाला. अपघातानंतर डंपरचा चालक फरार झाला असून मेघवाडी पोलिसांनी क्लीनर ब्रिजेश पासवान (२७) याला ताब्यात घेतले आहे.

जुहू समुद्रकिनाऱ्यावर महिलेचा मृतदेह
मुंबई: जुहू समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. शमीम खान (४५) असे या महिलेचे नाव असून ती जुहूच्या नेहरूनगर येथे पती आणि दोन मुलांसमवेत राहत होती. ही महिला बुधवारी कामानिमित्त बाहेर पडली होती. पण रात्री उशिरापर्यंत घरी परतली नव्हती. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास तिचा मृतदेह जुहूच्या सिल्वर बीचवर आढळला. तिच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.

चोरीच्या उद्देशाने वृद्धेची हत्या
मुंबई : मुलुंडच्या गव्हाणपाडा येथे राहत्या घरात एका वृद्धेची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.लक्ष्मी मारुती नाईक (७०) या प्रगती सोसायटीत बहीण लीला नाईक (६०) यांच्यासमवेत राहात होत्या. त्यांच्या पतीचे तसेच दोन्ही मुलांचेही निधन झाले आहे. तर दोन्ही मुली विवाहित आहेत. बुधवारी लीला काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची नात कविता आजीला भेटण्यासाठी घरी आली होती. पण कुणी दार उघडत नव्हते. रात्री दहाच्या सुमारास लीला परत आल्यावर दुसऱ्या चावीने त्यांनी दार उघडले. त्यावेळी लक्ष्मी नाईक जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना त्वरीत राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चोराने घरातील १,४०० रुपये आणि लक्ष्मी नाईक यांच्या कानातील कर्णफुले चोरून नेली. मारेकरी नाईक यांच्या परिचयाचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू
 मुंबई : वेल्डिंग उपकरणाच्या उघडय़ा वायरमुळे विजेचा धक्का लागून आठ वर्षे वयाच्या एका मुलाला आपले प्राण गमवावे लागले. बुधवारी दुपारी वर्सोवा गावात ही दुर्घटना घडली.वर्सोवा गावातील शांतिवन हॉलच्या पाठीमागे असलेल्या मांडवी गल्लीत धनंजय यांच्या घरी वेल्डिंगचे काम सुरू होते. हे काम करताना सुरक्षेची कुठलीही उपाययोजना न करता उघडय़ा जागेवर इलेक्ट्रिक बोर्डावरून वीजपुरवठा घेण्यात आला होता. जवळच्याच झोपडपट्टीत राहणारे ख्वाजा मोईउद्दिन शेख यांचा आठ वर्षे वयाचा मुलगा करीम बुधवारी दुपारी खेळता-खेळता तेथे आला. वेल्डिंग उपकरणाच्या उघडय़ा वायरला त्याचा स्पर्श झाला. त्याचवेळी विजेचा जोरदार धक्का बसून तो जागीच मरण पावला. निष्काळजीपणा करून मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल वर्सोवा पोलिसांनी धनंजय व त्याच्या घरी काम करणाऱ्या कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाळीचा स्लॅब कोसळून मायलेक ठार
मुंबई : चाळीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला आणि तिचा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी गोवंडी येथे घडली.
 गोवंडीच्या शिवाजी नगर प्लॉट क्रमांक ३८ येथील एका चाळीतील एका घरावर एक मजला चढविण्याचे बेकायदा काम सुरू होते. सलीम नावाचा कंत्राटदार हे काम करत होता. काम सुरू असताना गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घराचा स्लॅब कोसळला. यावेळी घरात असलेली महिला अमिना, तिचा मुलगा आरीफ आणि १२ वर्षांची मुलगी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगारा उपसून जखमींना बाहेर काढण्यात आले. मात्र अमीना आणि आरीफ यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस आम्ही घरमालकाला दिली होती. मात्र त्यानंतरही त्याचे काम सुरू होते, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. पोलिसांनी कंत्राटदार सलीमवर गुन्हा दाखल केला असून तो फरारी झाला आहे.

शाळेची भिंत तोडून  सराफाचे दुकान लुटले
मुंबई : घाटकोपर येथील अंकुश गावडे रोडवरील बी. के. ज्वेलर्स हे दुकान बुधवारी रात्री अज्ञात चोरटय़ांनी लुटले. या दुकानाला लागून असलेल्या शाळेच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश मिळविला होता.घाटकोपरच्या पूर्वेला दिलीपकुमार जैन यांचे बी. के. ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. महानगर पालिकेच्या बंद असलेल्या शाळेच्या खाली हे दुकान आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यावर दुकान लुटले गेल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दुकानाला लागून या शाळेचा जिना आहे. चोरांनी नेमकी ही बाब हेरली आणि या जिन्याजवळील भिंतीला भगदाड पाडून रात्री दुकानात प्रवेश केला. दुकानातील आठ लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे संतप्त सराफांनी गुरुवारी दुपारी पंतनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

कोपरखैरणेत मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार
नवी मुंबई  : कोपरखैरणेतील बोनकोडे गावातील १७ वर्षीय मुकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहे. लक्ष्मण वाघमारे उर्फ लकी (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कोपरखैरण्यातील राहणारा आहे. पीडित मुलगी आईसह या ठिकाणी राहते. मंगळवारी मुलगी घरात एकटीच होती. रात्री पावणे नऊच्या सुमारास  लक्ष्मण त्याच्या मित्रासह तेथे आला. आणि पीडितेवर बलात्कार केला़ आईला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्यांनी दिली़ या घटनेनंतर भेदरलेल्या मुलीने एकाच्या मदतीने पोलिस ठाणे गाठले. तिने दिलेल्या माहितीवरून लक्ष्मण याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक ए.एस.अवचट यांनी दिली.

पालिका अधिकाऱ्यासह  नगरसेवकाला लाच घेताना अटक
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रभाग क्रमांक २९ मधील शिवसेना समर्थक अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांच्यासह पालिकेच्या ब प्रभागाचा प्रभाग क्षेत्र अधिकारी व उपअभियंता दत्तात्रय मस्तुद, शिपाई विलास कडू यांना चार लाखाची लाच घेताना गुरूवारी रात्री ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली.  प्रभागातील एक अनधिकृत गाळा न तोडण्यासाठी शिवसेना समर्थक अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर, प्रभारी प्रभाग अधिकारी मस्तुद, शिपाई कडू यांनी गाळेधारकाकडे अकरा लाख रूपये देण्याची मागणी केली होती, असे ‘एसीबी’ अधिकाऱ्यांनी सांगितले. तडजोड होऊन ही रक्कम आठ लाख रूपये देण्याचे ठरले. या रकमेतील चार लाख रूपयांची रक्कम स्वीकारताना अटकेची कारवाई केली. मस्तूद व कडू यांचा लाच स्वीकारताना प्रत्यक्ष सहभाग नसला तरी लाचेची मागणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.