मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोवन मार्गावर सर्व तयारी होऊनही केवळ सुरक्षा प्रमाणपत्रामुळे ही सेवा रखडली आहे. मात्र रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम सुरक्षा पाहणी १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पाहणीनंतर मेट्रोला प्रवासी सेवेसाठी हिरवा कंदील मिळणार आहे.
वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर हा मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी १२ फेब्रुवारी रोजी जाहीर केले होते. मात्र आयुक्तांकडे या प्रकल्पाचा सुरक्षा प्रस्ताव पाठवण्यातच आला नव्हता. आता प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयुक्त पद्मसिंह बघेल यांच्याकडे आला आहे. या प्रस्तावानुसार प्रकल्पाची पाहाणी करणार आहेत़

मतदान करणाऱ्यांना ‘एमटीएनएल’ची सवलत
मुंबई : मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, या हेतूने महानगर टेलिफोन निगमनेही आता पुढाकार घेतला आहे. एमटीएनएलने आपल्या दूरध्वनी तसेच इंटरनेट जोडणीवर २०० रुपयांची सवलत देऊ केली आहे. १७ ते ३० एप्रिलपर्यंत ही सवलत उपलब्ध आहे. मतदाराला मतदान केल्याचा पुरावा म्हणून बोटावरील काळी शाई दाखवावी लागणार आहे. टेलिफोन निमगच्या सर्व ग्राहक केंद्रात ही सेवा उपलब्ध असून १८००२२१५०० या टोल फ्री क्रमांकावर वा वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोदी राज्यघटना बदलतील – पृथ्वीराज चव्हाण</strong>
ठाणे: मोदी सत्तेत आले तर राज्य घटना बदलण्याचा प्रयत्न करतील. या पुर्वी वाजपेयी सरकारने तसा प्रयत्न केला होता. असे झाले तर सोशितांना न्याय मिळणार नाही. सत्ता एका विशिष्ट समाजासाठी असेल असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तकनगर येथील प्रचारसभेत केला.

‘शिक्षण हक्क’साठी मुंबई पालिकेकडे दोन हजारांवर अर्ज
मुंबई छशिक्षण हक्क कायद्यानुसार महापालिकेकडून सुरू असलेल्या ऑनलाइन अर्जनोंदणीची संख्या बुधवारी सहाव्या दिवशी दोन हजारावर गेली आहे. पहिल्या दिवशी केवळ ६३ अर्ज आले होते. आता नोंदणी वाढत आहे. ३० एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.
अल्पसंख्याकांसाठी नसलेल्या विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. या जागांची संख्या ८२४४ असून त्यात ३१२ शाळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी घरापासून एक किलोमीटर अंतरातील तीन शाळांचा पर्याय अर्जातून द्यायचा आहे. तीस तारखेनंतर या अर्जाची छाननी होईल. उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने प्रवेशाचा निर्णय होईल, असे शिक्षणाधिकारी शांभवी जोगी म्हणाल्या.