दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘प्रोबेट’च्या नेमक्या कुठल्या मुद्दय़ावर युक्तिवाद ऐकायचा याबाबत ५ मे रोजी सुनावणी होणार आहे.  बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘प्रोबेट’ला जयदेव ठाकरे यांनी विरोध करीत ‘प्रोबेट’वरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मालमत्ता हस्तांतरित करण्यास वा विकण्यास अंतरिम मनाई करण्याची मागणी केली होती.
‘प्रोबेट’बाबतच्या मुद्दय़ाबाबत दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे उघड करणे आवश्यक आहेत. तीही सादर करण्याचेही न्यायालयाने त्या वेळी म्हटले होते.

वीजचोरीवरून टोळीयुद्ध
मुंबई : गोवंडी, शिवाजीनगर परिसरात वीजचोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये आता टोळीयुद्ध भडकले आहे.  पप्पु कालिया या गुंडाने सोमवारी एकाच्या डोक्यात दगडाने प्रहार करून त्याला जखमी केले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी पप्पूला अटक केली असून पप्पूवर गोळीबार करणाऱ्या तिघांनाही अटक केली आहे.
गोवंडी, शिवाजी नगर, बैंगणवाडी या परिसरात  वीजचोरी करून ती अनधिकृतपणे झोपडपट्टय़ांमध्ये पुरवली जाते. या वीजचोरीत  पप्पू कालिया आणि राजेश चौधरी यांच्या टोळ्या कुप्रसिद्ध आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पप्पूवर गोळीबार केला होता. त्यात पप्पू जखमी झाला होता.